नियती

चाकाखाली चिरडून मेले पिल्लू गोजिरवाणे !

मरण्यापूर्वी तडफडले ते भेसूर केविलवाणे -

इतक्यातच ते शिकले होते टाकण्यास पाऊल

मृत्यूची का कुठून तयाला लागावी चाहूल

दोष काय तो त्या चाकाचा ? काय तयाचे वैर ?

पुढे धावण्या बांधिल तेही, चाक कोठचे स्वैर

चालकही तो रोखू न शकला जरी वांछिले मनी

बेगुमान अन निंद्यच ठरला अखेरीस तो जनी

अविरत वाही काळ पुढे अन अविरत त्याची गती

कुणासही सांगता न येई नाव तयाचे नियती - !