हातभार

हातभार
.

रोज दिसणारी ती!!
आज परत दिसली.

रंग थोडा उजळलेला,
अंग जरा भरलेलं,
पोट किंचित वाढलेलं.

मग ते तसाच वाढत गेलं.
गोल गरगरीत झालं.

तरी दिसायची ती...

हातात तेवढाच डोलारा,
अन अंगावर ही !...

मग आठ-दहा दिवस असेच गेले
ती कुठेच दिसली नाही.
ना प्लॅटफँर्मवर, ना डब्यात.

मग त्या दिवशी परत दिसली.
तशीच......पण
थोडी विस्कटल्यासारखी,
थोडी थकल्यासारखी,
डोक्यावरचे ट्रे, हातातली झुंबरं सावरत.

पोटावरची गोलाई पाठीवर तोलत.
तेव्हा पासून ती तशीच दिसते.
कधी पुढे तर कधी पाठीमागे वाकलेली !

आता माझ्या नजरेत कणव असते.
अन नको असताना ही
कधी मधी पिना टिकल्या घेते मी
तिला हातभार लावण्यासाठी.

स्वाती फडणीस.........................२२-०२-२००८