भटका

भटका

एकविसाव्या शतकातील भटका
गावच नाही मला,
वावराशी न पाहिलेल्या
नातं सांगतो आज्या.

राज्य राज्य फिरता फिरता
झालो त्यात्या मातीचा.
वंशावळीच्या गुंडाळ्या
दावती पाऊल खुणा.

पोटासाठी विती एवढ्या
किती तुडवल्या वाटा
जिथे मिळाला घास जीवाला
शोधला तिथे निवारा.

आता रुजलो, रुजलो म्हणता
आवरावा लागे पसारा.
पाठीवरती घेऊन पिलांना
पुन्हा शोधणे नव्या दिशा!

स्वाती फडणीस ......................२८-०२-२००८