लोक म्हणतात-"काळ गेला,
गेलाच तो, ---सगळंच संपलं,
काळाच्या मोठ्या पोटात
आपलं जगणंच खुंटलं
चाक फिरवून आणता येतं---
----काळ मात्र तसा नाही!
तडाख्यातून त्याच्या तर
काहीच सुटत नाही
चढती कमान त्याची सतत
उंच जात राहते
वर वर चढताना
जमीन लांब जाते"
------सगळं खरं असलं तरी
एक करता येतं
पुढे आपण गेलो तरी
मागे वळता येतं,
घाईघाइतलं मागचं जगणं
रवंथ करता येतं!
"कठीण आहे" म्हणताय?
अगदीच नाही बघा---
वाळूच्या घड्याळाला
उलटं ठेवून बघा!
रचनाकाल : ५ मार्च २००८.
माघ कृष्ण त्रयोदशी, शके १९२९.