क्षणा-क्षणांचे मोती.
हलके-हलके धावणारी
वाट नागमोडी
वळणा-वळणावरती दिसती
रुपे बालपणीची
पावसात न्हालेली
तृप्त साजरी सृष्टी
सर परतीच्या पावसाची
अशी अचानक यावी
मनातल्या ओलाव्याने
नखशिखान्त भिजून जावी
चिंब-चिंब मी मुक्त मोकळी
झेलत जाईन सरी
अवचित पडल्या गारांनी
जडावेल ओढणी
आठवेन मज अवखळ ती मी
झगा भरून धावणारी
चट पोहचावे सख्यांजवळी
हिम-मोती बांधून गाठी
मुक्त-पणे ते उधळता मोती
हास्य-फुलांचे इमले चढती
अक्षय धन ते मज जवळी
क्षणा क्षणांचे मोती
दौलतीत त्या कुबेरच मी
कितिंदा पहाते फिरुनी
अस्पर्श मोती-पवळी
नाजूक प्राजक्ताची
स्वाती फडणीस......................२००६