तुझ्या पायी आलो
मी नतद्रष्ट
कसा झालो भ्रष्ट
कुणा ठावे ||
कोपरी मनाच्या
आम्ल साकळले
कसे आकळले
तुझिया मना ||
सर्व जग झाले
कडवट काळे
त्याचे ठोकताळे
तूच बांध ||
साचल्या रक्ताच्या
झडपा कोंदल्या
अंतरी नोंदल्या
वेदना माझ्या ||
अंधार दाटला
सूर्या ग्रासे राहू
आता कशी दावू
खूण अंतरीची ||
क्षीणावली दिठी
विझे ऐलतीर
आता पैलतीर
तुझिया ठायी ||