रे मना....[गीत]

रे मना....मृगजळावरी, तु भाळतो कशाला..?
हे गंध भासधुंद, तु माळतो कशाला...?

हे शब्द आपल्यांचे की खेळ सावल्यांचे?
जुने प्रश्न हे उन्हाचे, तु टाळतो कशाला...?

ती वेदना खरी, जी तुझ्या खोल अंतरी!
खुळे पथ्य यातनांचे, तु पाळतो कशाला...?

हे गीत अंतराचे! तिच्या ओल्या स्वरांचे
ते स्वर असे पुन्हा, तु गाळतो कशाला...?

ही जुनी बात झाली, 'ती स्वप्नात आली'
या नव्या चांदराती, तु जाळतो कशाला...?

क्षण शब्दशः मोती, क्षण आठवेच होती
ही आसवे उगाची, तु ढाळतो कशाला...?

-सचिन काकडे [ मार्च १२,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच " हा खेळ सावल्यांचा"