स्वरांक आणि ओंकाराधिष्ठित स्वरसाधनेची केतकर पद्धत

स्वरांक आणि ओंकाराधिष्ठित स्वरसाधनेची केतकर पद्धत

१८ मार्चच्या ठाणे वृत्तांतमधे वरील विषयावर चार दिवसांचे शिबिर, २० ते २३ दरम्यानच्या लागून आलेल्या सुट्ट्यांमध्ये, डोंबिवलीत, डॉ.केतकर घेणार असल्याची बातमी वाचली. त्यापूर्वी नुकतीच त्यांची मुलाखत एम.टू.जी.टू.मधे वर्षा उसगावकर यांनी घेतलेली, मी सह्याद्रीवर पाहिलेली होती. ह्या स्वरसाधनेनी दमसास वाढतो असेही सांगितले गेले होते. माझी अँजिओप्लस्टी झालेली असल्याने मी आरोग्यसंपादनाच्या साधनांच्या शोधातच असतो. म्हणून मी हे शिबिर करण्याचे पक्के केले. रोज दीड दीड तास हे शिबिर चालले. एकूण सहा तासात स्वरसाधना कशी करावी ह्याचे पूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले. पुढील साधनेस सोयीचे व्हावे म्हणून त्यांनी दोन श्राव्य तबकड्याही दिल्या आहेत, ज्यात ओंकारोच्चाराचा शास्त्रशुद्ध सराव करण्यासाठी सूर वाजत राहण्याची आणि पंधरा पंधरा सेकंदाचे अंतराय कळण्याची सोय आहे. शिबिराच्या अनुभवावरून, आरोग्यसंपादनाचे एक खात्रीचे साधन म्हणून ह्या स्वरसाधनेचा उपयोग होऊ शकतो असे मला वाटले.

ह्या संदर्भात, ही स्वरसाधना कशी आहे ह्याची ओळख इथे स्वानुभवाचे आधारे करून द्यावी हा ह्या लेखाचा उद्देश आहे.

स्वरसाधनेची रूपरेषा व्यक्त करतांना केतकर लिहितात "प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे म्हणता येतील असे दोन शोध संगीत क्षेत्रात आता उपलब्ध झालेले आहेत. एक आहे 'स्वरांक'. दुसरा म्हणजे वस्तुनिष्ठ मोजमापाने एका महिन्यात प्रगती नोंदवणारी एक अभिनव पण 'मूलभूत साधना पद्धती'. संगीत क्षेत्रात व्यक्तीगत संगीतार्हतेबाबत मोजमापने करण्याचे साधन उपलब्ध नव्हते. 'स्वरांका' च्या स्वरूपात ते प्रथमच प्रस्थापित होत आहे. बुद्धीची पातळी मोजणारा जसा बुद्ध्यांक (इंटेलिजन्स कोशंट) तसाच कानाची सांगितिक क्षमता पातळी मोजणारा स्वरांक (एम. एन. क्यू. - म्युझिकल नोटस कोशंट). हा स्वरांक विशिष्ट पद्धतीने साधना केल्यास सुधारू शकतो. एवढेच नव्हे तर दमसास आणि आवाजाची पट्टीही त्या साधनेने वाढते." संगीतकार यशवंत देव यांनी स्वतः या साधना पद्धतीचा अनुभव घेतला आणि चांगली प्रचिती आल्यावर या पद्धतीचे 'केतकर पद्धती' असे नामकरण स्वतः त्यांनीच केले आहे. श्री.केतकर यांनी केलेल्या या संशोधनावरील प्रबंधास नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने डॉक्टरेट दिलेली आहे. स्वरांकाची संकल्पना, विकास, सिद्धता आणि उपयोग त्यांच्या खालील पुस्तकात दिलेली आहे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ

पुस्तकाचे मलपृष्ठ

स्वरसाधनावर्गात खालील क्रिया प्रात्यक्षिक आणि रियाझ ह्या स्वरूपात करवून घेत.

१. प्रार्थना
२. ओंकार ध्यान (सुरवातीला ५ वेळा, नंतर १० वेळा)
३. तीन प्रकारचा कपालभाती प्राणायाम (सुरवातीला ३०-३०-३०, नंतर १००-१०-१००)
४. दोन प्रकारचा उज्जायी प्राणायाम (सुरवातीला १० आवर्तने, नंतर २०-२० आवर्तने)
५. दोन प्रकारचा भ्रामरी प्राणायाम (सुरवातीला १० रेचक, १० पूरक, नंतर २० रेचक, २० पूरक)
६. सामुहिक आरोह आणि अवरोह (चढत्या व उतरत्या स्वरांमधे ओंकारोच्चारण) (सुरवातीला ३ व नंतर ५)
७. ओंकारध्यान (सुरवातीला ५ वेळा, नंतरही ५ वेळा)
८. साधनेच्या शेवटी म्हणायची प्रार्थना

सुरवातीची प्रार्थना

॥ श्री गणेशाय नम: ॥

या कुन्देन्दुतुषारहारधवला । या शुभ्रवस्त्रावृता ॥
या वीणावरदण्डमण्डितकरा । या श्वेतपद्मासना ॥
या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवै: । सदा वंदिता ॥
सा मां पातु सरस्वती भगवती । नि:शेष जाड्यापहा ॥ १ ॥

ब्रह्मनादं विष्णुनादं नादरूपं महेश्वरं । नादानंदं परब्रह्म तं नादं समुपास्महे ॥ २ ॥

ओंकारंबिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः । कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमोनमः ॥

॥ ॐ नादब्रह्मणे नमः ॥

जाड्य म्हणजे तना-मनाची हालचाल टाकून देण्याची प्रवृत्ती. सरस्वतीने ती 'अपहा' म्हणजे खेचून न्यावी. समूळ नष्ट करावी. तसेच 'काय करायला हवे ते कळणे' आणि 'प्रत्यक्ष वर्तन' ह्यांतील अंतर नि:शेष नष्ट व्हावे म्हणून नादानंदांची उपासना.

शेवटी म्हणायची प्रार्थना:

समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने ।
योगमेवाभ्यसेत् प्राज्ञः यथाशक्ति निरंतरम् ॥

संपर्कः

डॉ.गोविंद काशिनाथ केतकर, 'निवारा' बंगला, सुयोग कार्यालयाजवळ, टिळकपथ, डोंबिवली(पू) ४२१२०१
दूरध्वनी: ०२५१-२४४९२०२, २४५३५४५ भ्रमणध्वनी: ९८७०१५७३१४
ई-मेलः दुवा क्र. १ , दुवा क्र. २

प्रकाशित करण्यापूर्वी केतकरांच्या अनुमतीची वाट पाहत होतो म्हणून अंमळ उशीर होत आहे.
त्यांची अनुमती मिळताच आता हे प्रकाशित करत आहे.