एका माळेचे मणी

भोवती सगळेच जातीचे निघाले
कावळे ते सर्वपित्रीचे निघाले

लाल, भगवे, हात, हिरवे, आणि हत्ती
सर्व उत्सुक राजगादीचे निघाले

लाभता खुर्ची किती जडतात ह्यांना
शासकांचे रोग साथीचे निघाले

जे सभा जिंकून गेले भाषणाने
बाहुले निर्जीव, चावीचे निघाले

वासना वृद्धापकाळीही सुटेना
सर्व अनुयायी ययातीचे निघाले

हेच का स्वातंत्र्य ज्यासाठी हजारो
पुत्र फाशी हसत आईचे निघाले ?

सप्त सिंधूंचे नको आणूस पाणी
देवतांचे पाय मातीचे निघाले

(मोह झाला का सवंगाचा तुलाही ?
काव्य करता वाक्य टाळीचे निघाले...)