'गूळ' कसा लपवायचा?

> एक कोडं घालू?
जिथं 'गूळ', तिथं मुंग्या,
जिथं सुख-समृद्धी, तिथं 'उपरे', आक्रमणकर्ते'
तर मग सांगा पाहू!, 'गूळ'  कसा लपवायचा?
>>गुळाचा आणि सुख-समृद्धीचा काय संबंध? हवं तर असं विचारा की 'सुख-समृद्धी' कशावर अवलंबून असते?
>ठीक आहे. तसं म्हणा हवं तर.
>>बरं काही सूचक दिशा मिळेल का?
 >'सुख-समृद्धी' ज्या गोष्टीवर अवलंबून असते, ती गोष्ट आपणहून दुसर्‍याला 'प्रत्यक्ष' वा 'थेट' देता येत नाही. (पण ती आडवळणाने देता येऊ शकते वा ती गमावली जाते.) पण तसा प्रयत्न केल्यास 'तोंडघशी पडून' संकटाला सामोरे जाणं भाग पडतं व वाईट म्हणजे एकदा गमावल्यावर ती गोष्ट परत मिळविणं मात्र अशक्य असतं.
तर मग सांगा पाहू!, 'सुख-समृद्धी' कशावर अवलंबून असते ते?
>>पैशावर!
>..नाही. कारण पैसा हा तर विश्वासावर अवलंबून असतो. व 'पैसा' परत मिळविता येतो.
>>मग 'विश्वासावर' 'सुख-समृद्धी' अवलंबून असते!
>...नाही. कारण 'विश्वास' हा धैर्यावर अवलंबून असतो. संधी मिळाल्यास, 'विश्वास' पुन्हा जिंकता येतो.
>>'धैर्य' म्हणजे काय?
>'धीरता' व 'वीरता' यांच मिलन म्हणजे 'धैर्य'
>>मग नक्कीच 'धैर्यावर' 'सुख-समृद्धी' अवलंबून असते!
>...नाही. 'धैर्य' कधीतरी गळून पडू शकते. जेव्हा 'धैर्याला' आळसाचे ग्रहण लागते, तेव्हा सतत प्रयत्नशील असणार्‍यांचे वा कामसू कष्टकर्‍यांचे 'आव्हान' मिळते.
>>म्हणजे 'सुख-समृद्धी' 'कष्टावर' अवलंबून असते असच नां?
>'नाही' सुद्धा 'हो' सुद्धा!
>>असं कसं! नाण्याला दोनच बाजू असतात उत्तर एक तर 'होकार्राथी' तरी असायला हवे किंवा 'नकार्राथी'.
>नव्हे! नाण्याला जरी दर्शनीय दोन बाजू असल्या तरी त्याची 'कडा' त्याची तिसरी बाजू  ही असतेच नां?
>>म्हणजे काय बुवा?
>'कष्ट' हे सुख-समृद्धीच्या श्रेयातील 'हिस्सेदार' असू शकतात. पण 'कष्टाचा दर्जा'  नावाची तिसरी बाजू त्या 'सुख-समृद्धीच्या श्रेयातील' वाटा नव्हे 'हिस्सा' किती असावा ते ठरवतात.
>>म्हणजे 'सुख-समृद्धी' 'कष्टाच्या दर्जावर' अवलंबून असते?
>नाही. असं स्पष्टपणे उच्चारलं तर, 'तंटा' होणार व तो वाढत जाणार.
>>आता कमालच झाली बुवा! स्पष्ट शब्दात 'खरं' उच्चारता येत नाही म्हणजे काय?
>तुम्हाला 'गूळ' लपवायचा आहे, की 'सुख-समृद्धी' कशावर अवलंबून असते? या प्रश्नाचं उत्तर हवंय?
>>तुम्ही सारखं ‘गूळ’, ‘गूळ’ काय करताय?
>अहो! मला तुम्हाला काही तरी सांगायचंय, पण ते 'आडवळणाने'.
>>'आडवळणाने सांगून'  ते समजून घेणार्‍याला समजलेच नाही तर त्याचा काय उपयोग? तुम्हाला जे काय सांगायचंय ते स्पष्ट शब्दांत सांगाना? मराठी माणसाने कसं ‘रोकठोक’ बोलायचं असतं.  द्न्यान देण्याच्या थाटात काय बोलताय? 
>तुमचं 'रोकठोक' म्हणजे अगदीच 'उघडं-नागडं' आहे बुवा!
>>तुम्हाला काय वाटतं? आम्हाला समजत नाही, तुम्हाला काय सांगायचंय ते.  सध्याच्या 'राज ठाकरेंच्या परप्रांतिय आंदोलनाबद्दल तुम्ही बोलताय हे न समजण्या इतपत आम्ही 'दुतखुळे' नक्कीच नाही आहोत. तुम्ही द्न्यान देण्याच्या थाटात बोलायचं सोडून जे काय बोलायचे ते स्पष्ट बोला.
>जाऊ देत. 'रोकठोक'च्या नावाखाली 'ताळतंत्र सोडून' बोलणांर्‍याशी ‘शालीनता संभाळणार्‍या’ व्यक्तीने बोलणं म्हणजे स्वतः ची 'पुण्याई' गमावण्याची तयारी करण्यासारखंच असतं. तुमच्याशी इथवरच संभाषण आटोपतं घेण्यात 'शहाणपण' आहे.
>>अरे वां? 'ज्ञानोपंत' गप्प का बसले?  तुमच्या ‘त्या’ गुळाचं काय झालं? अहो शुक-शुक! कोड्याचं उत्तर न देताच कुठे चाललात?