निसर्ग मंदिर
.
काळ्याभोर कातळाची
तास तासली पायरी
पायरी पायरी चढ चढवुनी
नेई जणू स्वर्गी
झिळमिळ झिळमिळ
चमचम चमचम चमकी
मंद झुळूक सुवास ल्याली
अखंड पुष्पवृष्टी
लाललाल मातीत उभारली
गुलबट चिरेबंदी
चिरेबंदी अन बुरूज दोन्ही
ऐसी मजबूत तटबंदी
स्वर्गलोकीच्या या महाली
किलबिल किलबिल गाणी
प्रवेशण्यापूर्वी दालनी
पायरी पायरी रेंगाळत चढुनी
निरखू बाग फुललेली
रंग रंग विखुरले भवती
मग पहावी शोभा दालनी
नजाकतीने भरलेली
हिरवी पिवळी नाजुक नक्षी
गोलगोल उंच घुमटी
मध्ये कोरून बसवले कुणी
फिक्कट निळे पक्षी
किणकिणणारे झुंबर मधी
झगमग त्या झुंबराची
करून मुजरा निर्मात्यासी
पडून राहावे चरणी
आनंदाचा डोह इथेची
हीच खरी स्वर्गभूमी
अवतीभवती शीतल शांती
शांत शांत चित्ती
स्वाती फडणीस .................... ३१-०३-२००८