सारे तुझ्यात आहे.... प्रवास....२

कुवेतला परत आल्यावर मनात सगळे हेच विचार सुरु होते.  अभिजीतने प्रशांत लळीतशी ओळख करुन दिली.  ऑर्कुटवर प्रशांतशी मस्त गट्टी झाली.  बोलता बोलता असं लक्षात आलं की ही सगळी फ़ार ग्रेट मुलं आहेत.  एकदम जबरदस्त कलाकार मंडळी.  इतके उच्च कलाकार असूनही खूप साधे.  डिसेंबर पर्यंत आम्ही सगळे एकमेकांचे चांगले मित्र झालो.  आता ह्या कामात मज्जा वाटायला लागली. 

सगळ्यात मोठं काम होतं ते गाणी निवडण्याचं.  १४ सुंदर चालींमधून ८ गाणी निवडणं सोपं नव्हतं.  आम्ही त्यावर खूप चर्चा केली.  अभिजीतला आवडणारी आठ गाणी, प्रशांतला आवडलेली आणि मला आवडलेली अशा याद्या केल्यात.  त्यातली कॉमन गाणी निवडलीत.  देवकी पंडित, वैशाली सामंत ह्या दोन गायिका आधीच निश्चित केल्या होत्या.  पण अल्बम मधे फ़क्त गायिकाच असणं कदाचित एकसुरी वाटू शकतं म्हणून एक पुरुष गायक हवा होता.  पहिला आमचा चॉईस अभिजीतच होता आणि त्यानंतर स्वप्निल बांदोडकर.  पण अभिजीतला ह्यावेळी फ़क्त संगीतकाराच्याच भूमिकेत बागडायचं होतं......त्यामुळे स्वप्निल बांदोडकर हे नाव निश्चित झालं.  आता अजून एक प्रश्न होता.  निवडलेल्या गाण्यांमधे फ़क्त एकच गाणं पुरुषाचं होतं.  मग एक युगल गीत का असू नये...... असा विचार मनात आला.  तो प्रशांत आणि आभिजीतला पटला सुद्धा.  ओला वारा हे गाणं आधी फ़क्त वैशाली साठी ठरवलं होतं.... त्याच गाण्याचं युगलगीत केलं. 

आता आठही गाणी नक्की झाली होती.  चार गाणी देवकीताईंची, एक सोलो स्वप्निल चं, दोन सोलो वैशालीची आणि एक युगल गीत वैशाली आणि स्वप्निलचं.  माझी भारतात जायची तारीख सुद्धा ठरली.  इकडे आभिजीत आणि प्रशांत ने देवकीताई, स्वप्निल आणि वैशाली शी बोलून त्यांचा होकार मिळवला होता आणि तारखाही निश्चित झाल्या.  अंधेरीचा बझ-इन स्टुडियो निवडला होता ध्वनिमुद्रणासाठी. मी २० दिवसांसाठी भारतात जाणार होते. सगळं रेकॉर्डिंग वगैरे आटोपून जमलंच तर काही म्युझिक कंपनींना भेट देणार होते.  जर छानशी ऑफ़र मिळाली तर कॉन्ट्रॅक्ट साईन करुनच येणार होते.  नाहीतर मग पुन्हा जूनमधल्या भारत भेटीत नव्या जोमाने कंपन्यांकडे जाणार होते.  माझा मुलगा अद्वैत कुवेतला पप्पांसोबत एकटा रहायला एका अटीवर तयार होता आणि ती म्हणजे त्याच्या वाढदिवशी म्हणजे २७ जानेवारीला मी परत कुवेतला यायला हवी.  त्यावेळी त्याला "हो" म्हणताना मला पूर्ण कल्पना होती...... मी त्याला फ़ार दुखावणार होते.