अवघे पाऊणशे वयमान...

परवा म्हणाले कोणीतरी, दाढीची खुंटे पिकली जरी

बायको पोरं नातवंड घरी, तरी पंतांवर फिदा पोरी ॥१॥ 

          
 
कधीतरी असं दोस्त  बरळती, वृद्धांच्या त्या कट्ट्यावरती

मूठभर मांस तेव्हा चढती, आमुच्या सापळ्यावरती ॥२॥

          

पण!, आमुचा हा हर्ष राहतो, क्षणभराचा सांगाती

कोणाचीतरी खवचट वाणी, एवढ्यात बोलूनी जाती ॥३॥

         

"जास्त चढू नये पंतांनी, हरभऱ्याच्या झाडावरती

असेल तिजला 'सहानुभूती', ज्येष्ठ नागरिकांप्रती" ॥४॥

        

नुकतेच  आम्ही  साजरे केले, अवघे पाऊणशे वयमान

केस डोक्याचे केव्हाच गेले, पंत मात्र जवान ॥५॥

         

दातांचीही पुरती पंगत, कधीची उठूनी गेली

कवळी बसवुनी आमुची, शष्ठब्द्यपूर्ती झाली ॥६॥

         

नरडं आता साथ देईना, खोकल्याचीही उबळ जाईना

जरी पाहतो सुंदर ललना, पूर्वीसारखी शीळ जमेना ॥७॥

         

चक्षूंनी मज साथ दिली, ऐन तरुणपणी

नयनांच्या त्या रुणातुनी, कसे वाहवे मुक्त कुणी ॥८॥

          

हा ही भार हलका झाला, जेव्हा लाभले रत्न मला

मुक्त जाहलो रुणातूनी, देऊनी मोतीबिंदूला ॥९॥

         

कानांचीही तिच गत, नीट ऐकूही नाही येत

हिमेशचा तो 'सुऽऽऽरूर' आर्त, अथवा लतेचे मधुर गीत ॥१०॥

        

पायही थकले, तोल गळाला , हाती धरले काठीला

अखेर!, पाच तपांच्या प्रतीक्षेनंतर, सवत लाभली बायकोला ॥११॥
   

      

असे जगावे जीवन की, व्याधींवरही विजयी व्हावे,

दुःखांवरही हसावे, आणि हसतमुखाने सोडूनी जावे ॥१२॥

       

स्वतः नेहमी हसणं आणि दुसऱ्यालाही हसवणं

हेच आजचं अस्तित्व आणि उद्याची आठवण ॥१३॥

                                             - श्रीयुत पंत