मराठी प्रेमींनो,
नमस्कार.
'मराठी अभ्यास केंद्रा'तर्फे मराठी शाळांसमोरील प्रश्न समजून घेण्यासाठी आणि कृतिकार्यक्रम आखण्यासाठी गुरुवार १७ एप्रिल रोजी पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, रमेश पानसेंसारखे शिक्षणतज्ञ आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची एक सर्वसमावेशक परिषद कुर्ला इथे नेहरूनगर(पूर्व) येथील शां. कृ. पंतवालावलकर शाळा इथे सकाळी ९ ते दुपारी ४.३० या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. मराठी भाषा व संरक्षण विकास संस्थेचे मराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषेपुढील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कृतिशील प्रयत्न करणाऱ्या अभ्यासकांचे व्यासपीठ आहे. या केंद्रातील मराठी विद्याजगत हा अभ्यासगट मराठी शाळांशी निगडित शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांशी संपर्क प्रस्थापित करून सर्वेक्षण-संशोधनाचे काम सध्या करत आहे.
१७ एप्रिल रोजी होणाऱ्या ह्या परिषदेत मराठी शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक, पालक, संस्थाचालक यांच्यासमोरील अडचणी, प्रयोगशील मराठी शाळा, शासकीय धोरण, राजकीय पक्षांची भूमिका अशी विविध चर्चासत्रे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. शैक्षणिक साधनांचे आणि पुस्तकांचे प्रदर्शनही या परिषदेत आयोजित केले जाणार आहे. मराठी शाळेशी निगडित सर्व घटकांना आणि मराठी भाषाप्रेमींना, ह्या संपूर्ण उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश परब आणि प्रा. दीपक पवार यांच्यातर्फे करण्यात येत आहे.
या परिषदेची पूर्वतयारी म्हणून नोंदणी करण्यासाठी आणि मराठी शाळांच्या सर्वेक्षण उपक्रमासाठी पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावल्या मागवून घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकांवर संपर्क करावा-
राममोहन खानापूरकर- ९८२०० ४००६६/२५८९ ०००९
वीणा सानेकर- ९८१९३ ५८४५६
आनंद हुले- ९८६९९ २५७२८
ई-मेल- दुवा क्र. १
परिषदेत चर्चिल्या जाणऱ्या विषयांची रूपरेखा पुढीलप्रमाणे-
मराठी अभ्यास केंद्राची ओळख-डॉ. प्रकाश परब(समन्वयक-मराठी अभ्यास केंद्र)
मराठी शाळा वाचवायच्या कशाला?-वीणा सानेकर(सदस्य-परिषद संयोजन समिती)
मराठी शाळांचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांसमोरील प्रश्न-
बाळासाहेब म्हात्रे(संचालक-प्राचार्य-संदेश विद्यालय)
आनंद तळेकर(माजी प्राचार्य-महानगरपालिका शाळा-माहिम)
शुभदा चौकर(लोकसत्ता)
मराठी शाळा- पालकांच्या नजरेतून
मराठी शाळांचा दर्जा-प्रयोगशीलता-मिलिंद चिंदरकर(प्राचार्य-महात्मा गांधी विद्यामंदिर,वांद्रे)
मराठी शाळा आणि राजकीय पक्ष- आस्था आणि अनास्था
मराठी शाळांसाठी निश्चित कृतिकार्यक्रम-
विशेष उपस्थिती- शिक्षणतज्ञ रमेश पानसे
वरील चर्चासत्रांमध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकता.
परिषदेची नोंदणी निःशुल्क असून चहापानाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
आपण जास्तीत जास्त संख्येने या परिषदेत सहभागी व्हावे असे सर्वांना आवाहन आहे!
धन्यवाद!