रुमाल

आज पहाटे पहाटे एक विचित्र स्वप्न पडलं. 
                      आम्ही कुठे होतो, तिथे का होतो, काहीच कळायला मार्ग नव्हता. दिसत होती ती फक्त एक अंधारी खोली असलेलं घर. त्या खोलीला एकच झरोका, उंच, निमुळता. त्यातून येणाऱ्या प्रकाशाने मनाला दिलासा मिळावा म्हटलं, तर उलट डोळ्यांवर असह्य झोत आला. कारण भोवती प्रचंड अंधार. गुदमरणारी हवा, आणि गार फरशी. भिंतींमधून काळोखाचे हात मला स्पर्श करायला शिवशिवताहेत. पण मी त्याला सरावलेली.  
                       पुढे सरकत ती खोली उघडणारा एक माणूस. त्याचं नाव मला माहिती आहे, पण मी ते उच्चारू शकत नाही. वाचा गेल्यासारखी. त्याने खोली उघडल्यावर मीच दचकलेली. खोलीत हात मागे बांधून बसवलंय तिला. मी तिला ओळखते. माझ्या कॉलेजमध्ये होती. बऱ्यापैकी निरागस. (तसे तेव्हा सगळेच निरागस असतो ना! तशी.) पण मी नव्हते कधीच येवढी सहज. मला होत्या नेहमीच माझ्या चिंता. असलेल्या खऱ्या समस्यांच्या आणि नसलेल्या खोट्या तत्त्वांच्या.
                      तिला मी अजूनही दिसलेली नाही. मी दाराच्या आडोशाने उभी. पण तिला मी ओळखते. तिचे हात बांधलेले, पण ती अजूनही तशीच दिसते. बारकी, गोरी, रेखीव. मी तिच्याबद्दल येवढा विचार करते ह्याचं मलाच आश्चर्य वाटतं. आणि तेवढ्यात तो माणूस मला सांगतो, “तू तिला दिसू नको. तिला तुझ्यामुळे कंफर्टेबल वाटायला नकोय.”
                  पण मग कसं काय? मी डोक्यावरून एक मोठा रुमाल बांधते. हल्ली दुचाक्यांवरून जाताना प्रदूषणापासून बचावासाठी लोक बांधतात तसा. कपाळावरून सपाट घेऊन कानामागे, आणि मग पुन्हा तोंडावरून पुढे ओढून एकमेकांवर दोन टोकं आच्छादून, मागे गाठ मारली. त्या सगळ्या क्रिया मी अजूनही विसरलेली नाही, ह्याचंही मला आश्चर्य वाटतं. भीतीही वाटते. पण मी निकराने रुमाल गुंडाळते. आता फक्त माझे डोळेच दिसतायत. पण नुसत्या डोळ्यांवरूनही ती मला ओळखेल असं वाटतं. तिने ओळखायला नकोय.
                मी पुढे होते. तिच्यावर खेकसते. “भांडी घास.” मी कमीतकमी शब्द वापरणार. कारण नाहीतर माझा आवाज! तिला आठवत असेल माझा आवाज? मला आठवतो ना तिचा? मग? कॉलेजामध्ये कधी फारसा संपर्क नसूनही, तशी ती जवळच्या मैत्रिणींत धरायची. धरावी लागणार. ती मला काहीबाही विचारते. “मला इथे डांबून का ठेवलंय?” असं. पण तिच्या स्वरात भीतीपेक्षा कुतूहल.
               आता मला चेव येतो. सगळ्या अंगात तिच्याबद्दलचा द्वेष कडूकडू होऊन सांडायला लागतो. तिने मला ओळखलं नसावं... का? माझे डोळे इतके सुजलेत? माझा बांधा आधी सुडौल होता तो आता ढब्बू मिरचीसारखा झालाय? तिने मला खूप वर्षात पाहिलं नाही, त्यामुळे तिला माहिती नसेल. मी आता अशी दिसते. पुन्हा द्वेषाची एक तार पायापासून डोक्यापर्यंत. तिला कसंकाय तसूभरही  मांस चढत नाही? सदा काटकिळी. हवं असेल तरी, नको असेल तरी. 
             हृदयाच्या तळाशी असलेल्या द्वेषानिशी मी तिला शिव्या घालते. शिव्याही दोन/तीन अक्षरांच्याच असतात. त्यामुळे भीती नाही. आवाज माझा तोच आहे अजूनही. का कोणजाणे. तो आवाज नसता, तर मी एक वेगळीच व्यक्ती म्हणून तिच्यापुढे जाऊ शकले असते. मग ही शरम वाटली नसती.
             कॉलेजामध्ये असताना मी नेहमी पहिली. सगळीकडे मिरवणारी. सगळ्यांचं कौतुक झेलत झेलत हलकी  होणारी. मला महत्त्वाकांक्षा होती, आणि जे हवं ते मिळवण्यासाठी लागणारे गुणही होते, भरभरून. बुद्धी होती. आणि आता? आम्हा दोघींच्याही जीवनाला जडता आलेली. संसाराच्या चक्रात गुरफटलेलो दोघीही. ती निदान मनापासून स्वयंपाक तरी करत असेल. मी ते ही करू शकत नाही. मी तिला खाली पाहत होते. आता पाहू शकत नाही. पुन्हा द्वेष, पुन्हा भीती.

             आता ह्या क्षणी खरं म्हणजे मी तिचा जीव घ्यायचा म्हटला तरी ती घाबरणार नाही. तिने माझी भीती चाचपडली आहे. माझ्या अभंग व्यक्तित्वातला चिरा- दिसलाय का तिला? हे असं होतं, खूप वर्षं झाली जगून की. हे कोणी मला सांगितलं नव्हतं.

मी पुन्हा तिला फरफटत खोलीत नेली. (खोली कसली, मोरी होती ती. आता हळूहळू जाग येत चालली तसं भान येतंय.) मी तिला पुन्हा हात मागे बांधून देते. जसं काही आता तीच मला हुकूम सोडणार. मी आपला चेहरा अजूनही दाखवत नाही. आणि ती अजूनही तिथेच बसली असेल, खोलीत. मी दार बंद केलंय पक्कं आणि तिथून निघून आले.
 

पण माझ्या चेहऱ्यावरचा रुमाल अजूनही तसाच आहे- घट्ट आवळलेला.