आराधन

आराधन


मला वाटलंच होतं, तू हसशील.

इकडे तिकडे उगीचच पहाशील

आणि खांद्यावर टपली मारून म्हणशील,

"चल रे ! तुझं आपलं काहीतरीच !"

मग मी म्हणेन, "काहीच नाही ?"

पण तू बोलणार नाहीस.

नजरही देणार नाहीस नजरेला...

मला वाटलंच होतं, तुझं मौन -

तुझीच साथ देईल नेहेमीसारखं


तुझे डोळे -

सतत माझ्यामध्ये काहीतरी शोधणारे -

ते तर फार आधीपासून सांगत आहेत.

तेच. जे मी शब्दांत सांगू पाहातो आहे आत्ता

पण मला वाटलंच होतं,

जेव्हा त्यांना हवं ते दिसेल -

तेव्हा बावरतीलच जरासे...

कळंत नव्हतं असं नाही.

तेव्हा पायर्‍या उतरताना घेतलेला किंचित आधार

माझ्यासाठी म्हणून दिलेला सगळा डबा

आणि ते पैजेच्या निमित्तानं,

हक्कानं घेतलेलं आईसक्रीम सुद्धा.

पण वाटलंच होतं मला -

आठवण करून दिल्यावर

खोल खोल पाहात म्हणशील,

"वेडाच आहेस...."

आणि चटकन मान वळवशील दुसरीकडे


पण हे तटस्थ राहू पाहाणारे श्वास -

हे बंड पुकारणारं ह्रुदय,

त्यांचं काय ?

धीर धरून तुझा हात हातात घेणं -

तितकंसं नाहीये अवघड.

पण हे उपरे शब्द जमवणंच महाकठिण.

एवढं करून मी जर म्हणालोच तुला-

"किती सुंदर आहेस तू... "

"देशील माझी साथ नेहेमी ?"

"हवी आहेस तू मला ..."

पण मला वाटलंच होतं, तू हसशील.

इकडे तिकडे उगीचच पहाशील

आणि खांद्यावर टपली मारून म्हणशील,

"चल रे ! तुझं आपलं काहीतरीच !"

पण जेव्हा मी निरुपाय होऊन अबोल होईन,

तेव्हा तू सहज माझ्या खांद्यावर डोकं ठेवशील,

आणि म्हणशील - "आहे मी. ...."




हो ना ?

.