सुखदुःखाचे झाड
किती विचित्र असते सुखदुःखाचे झाड ?
जळणारे खोड
आतून हिरवे असले तरी
पैशाला पैसा जोडत
जमवते चार पाने
समाचाराला- शिंका आली तर?
तशी व्यवहारीच पाने सुद्धा..
वरून शांत आतून वारा
शोधणारी- फक्त फायद्याचा
सगळे जमते तेव्हा होतो
हिरवागार वृक्ष पण सावल्या?
तशाच संकुचित ,खुरटलेल्या
मिटक्या मारत असते
जळक्या इच्छांची वाळवी
हिरवे असतानाच. मजेत...
पोखरत पोखरत असते
हिरवे झाड.. पोकळे सांधे
झाडामागून झाड कळवळणारे..