निळा - बा भ बोरकर

नमस्कार!

बरेच दिवसांनी मनोगती 'सखि' यांच्या सौजन्यानं  बा. भ. बोरकरांची एक अप्रतिम कविता सापडली! खाली देत आहे.

आख्खी कविता लिहून काढल्याबद्दल 'सखि'ला धन्यवाद.

#############################################

एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा
दूर डोंगरातला एक जरा, त्याच्याहून निळा

मोरपिसाच्या डोळ्याचा, एक मखमली निळा
इंद्र निळा, त्याला एक गोड, राजबिंडा निळा

विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा

असे नानागुणी निळे, किती सांगू त्यांचे लळे
ज्यांच्यामुळे नित्य नवे घडे, तुझे माझे डोळे

जिथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा
अशा कालिंदीच्या काठी, एक इंदिवर निळा

आपणही होऊ निळ्या, करू त्याच्याशी रंग संग
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे, रंग खेळतो श्रीरंग

################################################