बाबा रिक्षेवाला

बाबा रिक्षेवाला

मुलीला शाळेत सोडण्याकरता येणाऱ्या बसची वाट बघत आम्ही उभे होतो.
"आई, माझ्याएवढी असताना तू कशी जायचीस शाळेत? माझ्यासारखीच बसने? " मुलीने उत्सुकतेने विचारले.
" आम्हाला रिक्षेवाला यायचा न्यायला. " तिला हे उत्तर देताना माझ्या डोळ्यासमोर बाबा रिक्षेवाल्याचा चेहरा आला.
"ओह, तुम्ही ऑटोरिक्षातून शाळेत जायचा" रिक्शाचे नाव ऐकताच मुलगी म्हणाली. तिने शाळेच्या गणवेशातील मुलांना पुण्यात असताना ऑटोरिक्षाने जाताना पाहिले होते.
''नाही तसे नाही, सायकलरिक्षा.... '. पण सायकलरिक्षा म्हणजे नक्की काय? ते सांगताना माझा आवाज खोल गेला होता.
"बाप रे! तो एकटाच एवढ्या मुलांना न्यायचा! " मुलीची प्रतिक्रिया स्वाभाविक आणि अपेक्षित अशीच होती.
एक माणूस इतर माणसांचे ओझे वाहून नेतो, तेही एवढ्याशा मोबदल्यात हे तिला सांगताना मी खजील झाले होते. आज अमेरिकेत तर नाहीच पण पुण्यामुंबईसारख्या शहरात हातरिक्षेवाले चटकन दिसणार नाहीत. शाळाकॉलेजला जात असताना सायकलचे पायडल मारताना चढावर होणारी दमछाक मला आजही आठवते. त्याचवेळी आजूबाजूला 'सवारीला' ओढणारे रिक्षेवाले कुठे दिसले की मला 'बाबाची ' हटकून आठवणही येत असे याचेही तेवढेच स्मरण होते.
"आई, तुझा रिक्षेवाला काका खूप स्ट्राँग असेल नाही? "
तिच्या प्रश्नाचे उत्तर देताना मी लहानपणचे रिक्शाने जाण्याचे दिवस आठवू लागले.. खरंच कसा होता बाबा?

बाबा झब्बा पायजमा घालायचा. त्याचे डोक्यावरचे आणि दाढीचे केस होऊ लागले होते. बाबा बारीक चणीचा पण उंचापुरा होता. बाबाचे डोळे बारीक होते आणि उन्हाची तिरीप आली की ते अधिकच मिचमिचे होत. डोळ्यावर येणारी टोपी असली की त्याचे डोळे शोधावेच लागत! त्यावेळी बाबाचे वय अंदाजे पन्नाशीच्या जवळ असावे. सकाळी बरोबर नवाच्या ठोक्याला तो हजर होत असे. पुढे अर्धा तास जवळपासच्या सोसायट्यांतून मुले रिक्शांत भरून आम्हा मुलांना साडेदहाच्या शाळेला वेळेत नेण्याची जबाबदारी त्याची होती. किती कडक थंडी असली, जोराचा पाऊस पडत असला अथवा रणरणते ऊन असले तरी आम्हाला सोडायला रिक्षा नाही असे झाले नाही. तो स्वतः आला तर नव्याच्या ठोक्याला नाहीतर त्याने नेमलेल्या बदली रिक्षेवाल्याची हाक साडेनवाला ठरलेली असे. सवारी नेण्यासाठी रिक्शांत एक मोठी मुख्य सीट होती. तिच्या बरोबर दुसऱ्या बाजूला एक लाकडी फळी. या दोन्हीवर मुले बसत. रिक्षाच्या दोन्हीकडून आत शिरता येई. एकदा का मुले आत बसली की बसली की बाबा आधीच सीटखालून काढलेल्या फळ्या दोन्ही बाजूला लावून ठेवी. त्यावर तीन तीन मुले बसत. सीटखालची मोकळी जागा म्हणजे जणू खजिनाच होता. त्यात तीनचार फळ्या, फडकी, रिक्षादुरुस्तीचे कामचलाऊ सामान आणि पावसापासून बचावाकरता एक मोठे मेणकापड असे. पावसाळा सोडून इतर वेळी मोठ्या सीटच्या मागच्या बाजूला; जिथे ऊन्हापासून बचाव करण्याचे छत अडकवलेले असे त्या कापडाच्या मधल्या खिडकीत तीन जरा उंच आणि वयाने मोठी असणारी मुले बसत. याला बाबा बाल्कनीची जागा म्हणत असे!

रिक्षा चालवताना बाबा सदऱ्याच्या बाह्या अर्ध्याहून कमी होतील अशा आत दुमडून ठेवायचा. पायजमा रिक्शांत कुठे अडकू नये म्हणून दोन्ही पोटऱ्यांवर तो एक जाड कडे घालत असे आणि त्यात पायजम्याचे पाय दुमडून ठेवत असे. तो पायात काळ्या रंगाच्या चपला घाली. त्या चपलांना चांभाराकडून कित्येकदा जोड लावावा लागे. रिक्षा चालवता चालवता बाबा रस्त्याच्या कडेला अचानक थांबला की बहुधा दोनच कारणे असत! एक म्हणजे रिक्शाची चेन पडलेली असायची नाही तर बाबाच्या चपलेचा जोड तुटलेला असे. सरावाने आम्हाला चेन पडलेली नाही ते ओळखता यायचे म्हणजे बाबाची चप्पल तुटलेली आहे तेही समजायचे. हाताने जर चपलेचा जोड पुन्हा बसवता आला तर बाबा चप्पल घालून रिक्षा चालवू लागे. पण तसे फार कमी वेळा व्हायचे. मग बाबा सीटवर बसलेल्या मुलाला उठायला सांगे आणि सीटखाली असलेल्या जागेत आपल्या वाहणा ठेवून देई आणि तसाच अनवाणी पायांनी रिक्षा चालवत असे.
"बाबा, माझ्या डॅडींच्या चपला कधी तुटत नाही. तशा चपला तू का घालत नाहीस? "
"आपके डॅडी स्कूटर चलाते है इसलिए चप्पल अच्छी रहती है".
" माझे वडील बूट घालून जातात ऑफिसला, ते कधीच तुटत नाहीत. मी त्यांनाच सांगते तुलापण तसे बूट द्यायला"
त्यावर बाबा हसायचा. मुलांचे कौतुक करायचा... मी पण तशा चपला घालेन म्हणायचा...

पावसाळ्याच्या दिवसात तो भलामोठा रेनकोट आणि उन्हाळ्यात तो अगदी डोळ्यावर येईल अशी टोपी घालायचा. त्याला तरीपण दिसते कसे याचे कोडे मला त्या डोळ्यावर आलेल्या टोपीमुळे पडत असे. तो गळ्याभोवती आणि खिशात मोठे फडकेवजा रुमाल ठेवायचा. कुणाच्या इजा झाली, कुणाचा शर्ट भिजला असे काही झाले तरी बाबा त्याच्याजवळच्या फडक्याने तात्पुरते काम भागवी. आमच्या रस्त्यावर असणाऱ्या एका गोलाकार घुमटापुढे बाबा कधी रिक्षा थांबवत असे. खिशातून एक विशिष्ट मोठे फडके जमिनीवर अंथरे. डोके टेकवून काहीतरी पुटपुटत तो पुन्हा रुमालाची घडी खिशात ठेवून रिक्षा चालवायला सुरुवात करी. त्याचे ते पुटपुटणे सोडले तर इतर वेळी त्याचा आवाज चांगला खणखणीत होता.

'बेबी चलो' अशी त्याची हाक यायची तेव्हा माझे जेवण सुरू असे. जेवताना केवळ सवयीने घास तोंडात जायचा अन्यथा माझे कान आणि डोळे बाबाच्या हाकेकडे असत. सोसायटीच्या एका टोकाकडून एक एक करत तो मुलांना बोलवत असे. आईची हाक जशी मुलांना समजते तसेच बाबाच्या हाकेचेही झाले होते. तयारीला वेळ घेणाऱ्या मुलाला बाबा एका विशिष्ट पहाडी आवाजात हाक देई. रिक्शांत बसून भांडणे करणाऱ्या, खोड्या काढणाऱ्या मुलांना बाबा टोपणनावाने पुकारायचा. बालवाडीतल्या लहान मुलामुलींना तो ममतेने बोलवी. बेटी, बेबी, रानी किंवा मेरा राजकुमार असे म्हणून तो त्यांना संबोधत असे. सकाळची शाळा असली की तो मुलांच्या नावाने एकापाठोपाठ दोन हाका देई आणि गमतीने म्हणत असे की पहिली हाक मुलाच्या आईवडीलांकरता आहे!.
या आठवणी आम्हा मुलांच्या शहरात टेलेव्हिजन दिसू शकत नव्हता तेव्हाच्या म्हणजे साधारण १९८०-८३ च्या आहेत. माझी प्राथमिक शाळा गावात असणाऱ्या एका भल्यामोठ्या थिएटरशेजारी होती. जाता येता कानावर पडणारी सिनेमाची गाणी, सिनेमाचे संवाद आणि आपल्या रिक्षेवाल्याची भाषा यात साम्य आहे एवढे कळले होते. सरावाने आम्हाला ती कळायची आणि आमचे मराठी बोलणे त्याला समजायचे!

रिक्शांत बसायची इतर मुलांप्रमाणे मलाही नेहमी घाई असे. त्यामुळे जेवण लवकर होई. पण दुसरीकडे काही न खाताच जायची माझी तयारी असायची कारण रिक्शांत एखाद्या ठराविक जागा कधी हवी असायची. कधी मैत्रिणीजवळ बसायचे असायचे. एवढ्या बारक्या रिक्शांत कमीतकमी पंधरा मुले कोंबलेली असायची. त्यावेळी त्याचे काही वाटायचे नाही. कुणाचे पाय बाहेर लोंबताहेत, कोणी हात न धरताच बसला आहे, एका जरा वयाने मोठ्या मुलाच्या मांडीवर एकमेकांना चिमण्या पिलांप्रमाणे खेटून दोन मुले बसली आहेत यात आम्हाला काही नवल वाटत नसे. साधारण सर्व शाळेच्या रिक्शांत असेच दृश्य असे. पण आज विचार केला तर ते सगळंच अद्भुत वाटत. चढ आला की बाल्कनीत बसलेली मोठी मुले रस्त्यावर उड्या टाकत आणि मागून हाताने रेटा देऊन रिक्षा लोटू लागत. कधी सर्व मुले खाली उतरून त्याच्या मागे चालू लागत. मग बाबाला वेगाने रिक्षा ओढणे शक्य होई. बाबाला अशी मदत करण्यासाठी आमच्यात जणू स्पर्धाच असे. मग आम्ही भांडू नये म्हणून बाबा आम्हाला वार आणि फेरी नेमून देई. नियमितपणा, कामाचे विभाजन, टीमवर्क आणि वेळेचे महत्त्व बाबाने जाणले होते; आम्हालाही नकळत शिकवले होते.

बरेचदा नव्याने येणाऱ्या मुलाचा रिक्शाने जाण्याचा किंवा कित्येकदा शाळेचा पहिला दिवसही बाबामुळेच सुकर होत असे.
"देखो आज हमारे साथ कौन राजकुमार आया है. इसे आपके साथ बैठने दो'' असे म्हणून बाबा त्या मुलाला सीटवर नीट जागा करून देई. बाबाचे बोलणे ऐकून नव्याने रिक्शांत आलेला मुलगा रडण्यातूनच जरा हसरा चेहरा करे. बाबाने दिलेली लिमलेट खाता खाता इतर मुले त्याच्याशी बोलण्यात दंग होत. एकीकडे वाहत्या रस्त्याचे अवधान सांभाळून तो आमच्याशी बोलत असे. दोन्ही वेळेस रेल्वेचे रूळ ओलांडून आम्हाला पुढे जावे लागे. आतासारखे रेल्वेक्रॉसिंग सर्व ठिकाणी तेव्हा झालेले नव्हते. गाडी येत नाही ना, एवढी खात्री करायची आणि रूळ ओलांडायचा! एवढाच नियम. निघायला थोडा उशीर झाला तर रेल्वेकरता थांबावे लागे. दूरवर रेल्वे दिसत असली तरी आपण जाऊ शकू असे त्यावेळी रिक्शातल्या मुलांना वाटायचे.
"बेटा, दो मिनट रूक जाओ. दोन मिनटसे देर होगी, पर ये जिंदगी बडी किमती होती है. गाडी के जाने के बाद हम निकलेंगे. और हम कल से वक्त पर निकलेंगे"

किती साध्या शब्दात त्याने आम्हाला जीवनाचे महत्त्व सांगितले होते. आजही सिग्नलकरता चौकात उभे असताना, कुठे रेल्वेक्रॉसिंग करत असताना त्याचे शब्द आठवतात. सिग्नल तोडणारे बघितले की वाटते स्पर्धेच्या युगात आपल्या जीवाचे मोल न ओळखण्याएवढे आपण बदलतो का?

एखादा मुलगा वॉटरबॅग विसरला तर त्याला प्यायला बाबा स्वतःजवळचे पाणी देई. रिक्शांत बसलेल्या आपल्या सख्ख्या भावंडापेक्षा कित्येकदा मुले बाबाशीच जास्त बोलत. आम्ही रिक्शांत बसून गाण्याच्या भेंड्या, एकाच अक्षरापासून सुरू होणारे वेगवेगळे शब्द असे खेळ खेळत असू.
"नाही, मी गाणे म्हणणार" असा आवाज आला तरी तोवर दुसऱ्याने गाणे सुरू केलेले असे.
"मला म्हणायचे होते, थांबला का नाहीस? "
"पण हे गाणे तर झालेच आहे".
"चिडका आहेस तू"
"याला खेळायलाच नको घ्यायला"
एकमताने निर्णय होई.
"बाबा, मला खेळायला घेत नाहीत. पाहा कसे करतात" मुलगा हुकमी अस्त्र काढे. तोवर त्या मुलाचे रडणे, नाक वाहणे सगळे अगदी शिस्तशीर सुरू झालेले असे.
'' बेटा सब मिलके खेलो" बाबा समजावणीच्या सुरात आम्हाला चार गोष्टी सांगे. पुन्हा खेळ सुरू होई.
एवढ्याने काम झाले नाही तर कधी बाबा ' चूप रहो' असे मोठ्याने ओरडून आम्हाला गप्प करत असे. तर कधी इतरांना त्रास देणाऱ्या मुलाला 'शाळेतच ठेवेन घरी नेणार नाही' असा दमही बाबा देत असे. प्रसंगी पालकांकडे तक्रार सुद्धा नेत असे. कानावर तक्रार आली तरच पालक मध्ये पडत. माझ्या तक्रारी घेऊन घरी येण्याची वेळ त्याच्यावर महिन्यातून दोनचारदा तरी येई. तो वऱ्हांड्यात उभा राही आणि माझी आई त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेई. पण ती सगळी वादळापूर्वीची शांतता हे वेगळे सांगायला नकोच. आमच्या घरात धुणेभांडीवाली आणि कचरा नेणारा राजू येत असे. ते घरात येत. हे आजीला चालायचे पण बाबा दारात उभा राहायचा तरी आजी त्याला कधी आत ये म्हणत नसे. हे असे का? त्याचे कोडे पुढे उलगडले. नमाज पढणारा बाबा मुसलमान आहे हे आजीला माहिती होते आणि नक्कीच ते आजीला खटकत असे. त्यावरून मी तिला प्रश्न विचारून भंडावत असे.
" बाबा मुसलमान आहे तर काय झालं? "
"आपलं वेगळं असत.. "
"म्हणजे? "
"त्याचा देव वेगळा आपले वेगळे, त्याचे खाणेपिणे वेगळे.. "
"पण देव तर सगळीकडे असतो ना? राम, कृष्ण, विष्णू एक आहे तूच म्हणालीस ना? तर मग त्याचा देव का वेगळा? त्याच्या वॉटरबॅगमधले पाणी आपल्या पाण्यासारखेच लागते. " माझे बोलणे सुरूच राही.
शेवटी आई मध्यस्थी करायची आणि विषय बदलायची.

बाबा आम्हाला आमच्या सवंगड्यांप्रमाणे वाटे. शाळेत शिक्षिका काय म्हणाल्या, घरी काय झाले त्याची सर्व कहाणी कित्येक मुले त्याच्या कानावर घालत. आई रागावली, वडील बाहेरगावी गेलेत, आजोबा आजारी आहेत; सर्व त्यात आले. बाबा ते ऐकून घेई. मुलांचे दप्तर, रुमाल, डबे, वॉटरबॅग, फीचे पैसे सगळ्याचा हिशोब त्याच्याजवळ असे. ज्या विश्वासाने आम्हाला त्याच्या हातात सोपवले होते तो विश्वास सार्थ होता यात शंका नाही. चोरी म्हणजे नक्की काय याची कल्पना त्यावेळी नव्हती. जे आपले नाही ते घ्यायचे नाही, दुसऱ्याची वस्तू न विचारता घ्यायची नाही. एवढे मात्र पक्के होते. एकदा एका मुलाने त्याचे फीचे पैसे रिक्षावाल्याला न देता स्वतःच्याच खिशात ठेवले. फी पूर्ण मिळाली नाही अशी चिठ्ठी शाळेतून आली. मुलाच्या वडिलांचा आरडाओरडा बाबा रिक्षावाल्याने ऐकून घेतला, तो फक्त मी पैसे घेतले नाही एवढे म्हणत होता. आम्ही मुलांनी तेच सांगितले पण आमच्या कडे कोण लक्ष देतंय? त्या मुलाने आमच्या रिक्शाने येणे बंद केले. पुढे वडिलांना नक्की काय घडले याची पत्ता लागला... मुलाला बाबाच्या रिक्शाने पाठवण्याची त्यांची तयारी होती. पण 'आता माझ्या रिक्शांत जागा नाही' असे त्याचे उत्तर अजूनही लक्षात आहे.
त्याच्या रिक्शांत बसणाऱ्या प्रत्येक मुलाच्या घरच्या परिस्थितीपेक्षा बाबा अधिक आर्थिक अडचणीत होता. तो पुढच्या महिन्याचे पैसे आधीच मागत असे हे आठवत आहे. पण पैशाकरता कधी आमच्या वस्तू, फीचे पैसे घेणे आणि त्यावर पांघरून घालणे असे प्रकार त्याने केले नाहीत. याचे महत्त्व आता अधिक वाटते.
.............................

घर बदलले, शाळा बदलली. काही वर्षे शहरातून जाता येताना जुन्या शाळेच्या चौकात हटकून बाबा दिसत असे. पुढे आम्ही दुसऱ्या शहरात बदलून गेलो. रिक्शाने, बसने शाळेत जाणे सुटून पुढे हातात स्वतःची सायकल नंतर कॉलेजात कायनेटिक आली. बाबाची आणि माझी गाठभेट गेले कित्येक वर्षे नाही. त्याविषयी माहिती देणारे सुद्धा आता कुठे आहेत कल्पना नाही....
मुलीला शाळेत सोडतांना बाबाच्या आठवणी ढगाळलेले आकाश दूर करून मनात डोकावतात एवढे नक्की...

-सोनाली जोशी
(पूर्वप्रकाशित, एकता दिवाळी २००८)