तुझ्याचपाशी

माझ्या गोष्टी कितीतरी गं तुझ्याचपाशी !

माझ्या गोष्टी, कितीतरी गं तुझ्याचपाशी !

वळिवाची सर,गारा होत्या पडल्या तेव्हा,

मातीचा पण वास अजूनी,तुझ्याचपाशी !

वनराईतिल रात्री हिरवट, तृप्त सावल्या

त्या रात्रींची स्वप्ने अजुनी तुझ्याचपाशी !

श्वासांमधली उष्ण सुरावट, अबोल बंदिश

तान, समेवर भिनलेली ती,तुझ्याचपाशी !

दूर देवळामधल्या घंटा, किणकिण मंजुळ

पहाटवेळा अशा गुलाबी,तुझ्याचपाशी !

तसेच सारे, परी वेगळे रंग आजचे,

रंगांचे भरलेत कुंचले,तुझ्याचपाशी !

माझे माझे कशा म्हणू मी? तुझेच सगळे,

तुझेच सगळे,तुझे 'तुझेपण'माझ्यापाशी !