गाढ अंधारल्या रात्री
स्वप्न उमलते मनी
किती लावितसे आस
आभाळाची निळी वाट।
केला अंधार बाजूला
मन झाले पीस पीस
मुक्त स्वच्छंद फिरते
जगी स्वप्नांच्या अद्भुत।
निळी वाट तुडवली
तरी मार्ग गवसेना
मोठी चांदण्यांची रास
तरी सुगंध देईना।
जड झाल्या अंतराची
स्वप्न-दुनिया भंगली
"आस वांझोटी तयाची"
नवी जाणीव जागली।
पत्थरांची का असेना
हवी झाली खरी वाट
हवा घाम शिंपलेल्या
ओल्या मातीचा सुवास!!
रचनाकाल : ५डिसेंबर १९९४.