आसमंत गंधभारले सखि,
चांदणे नभात पेरले सखी
ना तरीहि येथ श्याम सावळा,
आठवांत मी विहारले सखी ॥१॥
वाजते मनात रोज पावरी,
जाहले कशी स्वरांत बावरी?
मी मलाच हे विचारले सखी ॥२॥
स्पर्श तोच या नसानसांतुनी
श्याम फक्त माझिया क्षणांतुनी
अंग अंग हे शहारले सखी ॥३॥
नेत्र पाहतील श्याम एकदा
चुंबतील ओठ त्यास कैकदा
मी मनात हे चितारले सखी ॥४॥
तो अनंगरूप श्याम एकला
घट्ट गुंतला, तरीहि मोकळा
गूढतेमुळेच भारले सखी ॥५॥
मोरपीस एक खूण अंतरी
ठेवली जपून मी युगांतरी
वाट पाहते, न हारले सखी॥६॥