उधळत, उसळत,-- थैमान घालणारं,
वादळ आता माणसाळतंय......
उजाड झाले आहेत किनारे
आणि निर्मनुष्य झाल्या आहेत वस्त्या
पाऊलवाटा शोधताना
स्वतः मधेच हरवलंय
पण तरीही ..........
वादळ आता माणसाळतंय !
एकाकी वृक्षावर
विस्कटलेलं घरटं सावरण्यासाठी
-----काडी काडी शोधतंय
कारण
वादळ आता माणसाळतंय!
उगारलेले हात जोडण्यासाठी
दुरावलेली मनं सांधण्यासाठी
आकांतानं तळमळतंय
कारण
वादळ आता माणसाळतंय!
राख पसरली आहे आकांक्षांची
आणि उरले आहेत
काही कोळसे ....... माणुसकीचे
उजाडलेल्या जमिनीवर, हिरवी पात शोधतंय
कारण
वादळ आता माणसाळतंय!
उरल्या नाहीत कसल्या खुणा
अन दीपस्तंभही कोसळलेले
स्मशानवाटेवर... जीवन शोधतंय
कारण
वादळ आता माणसाळतंय!
संघर्ष आहे शाश्वताचा-- अतर्क्याशी
आणि मानवतेचा ---- क्रौर्याशी
सत्यासाठी लढताना थकलंय
तरीही ..........
वादळ आता माणसाळतंय!