पाउसचित्रे (बापू आत्रंगे)

नवा संपादक मीटिंगमध्ये
जसा बोलबोल बोलत असतो,
तसा कोसळतोय पहिला पाऊस

कुलाब्यात अमुक इतका मिलीमीटर
सांताक्रुझला अमुक इतका मिलीमीटर
रस्ते पे पानीच पानी
तुंबलेत नाले, तुंबलेय गटर
अख्ख्या मुंबईचा मीटर डाऊन झालाय

अशावेळी आम्ही निवांत आपल्या घरात सुस्त
लोळतोय खाटेवर पेपर-बिपर वाचत दुपारच्या जेवणानंतर
नाचतेय नटी कामुक बरसातीत
कुटुंब रमलेय केबलमध्ये

अशावेळी... अशावेळी
तिकडे सखल भागात साचलेल्या पाण्यात
रेनकोटातली च्यानेलवाली बाई देतेय भीजबातम्या
सकाळपासून... पोटातली भूक आवरत
तिला आता हवाय चहा...
जसा तुमच्या पुढ्यात आहे ना तस्साच...
गर्रमगर्रम वाफाळता

तो फोटोग्राफर तिकडे कधीपासून लावून बसलाय क्यामेरा
गळ लावावा तसा गुडघाभर सांडपाण्यात
पकडायचीय त्याला आठ कॉलमी रंगीत दैना
उद्याच्या पहिल्या पानासाठी

आणि अजूनही नवा संपादक मीटिंगमध्ये
जसा बोलबोल बोलत असतो,
तसा पहिला पाऊस कोसळतोय

अर्थात तुम्ही पाहातच असाल म्हणा ते
तुमच्या दिवाणखान्यात
कोचावर लोळत असताना..

एका ब्लॉग वरील कविता आवडली म्हणून इथे देत आहे. कवी बापू आत्रंगे