... पत्ता नक्की मला पाठवा!!

..............................................
 ...पत्ता नक्की मला पाठवा !!
..............................................

एकत्र;  तरीही स्वतंत्र जेथे सारे
असतात मनांची खुलीच जेथे दारे
  ...त्या वास्तूला म्हणायचे घर !

गुणगुणते जेथे हसतमुखाची रमणी
चिवचिवते जेथे घरटे बांधत चिमणी
...त्या वास्तूला म्हणायचे घर !

वावरते जेथे आपुलकी अन् माया
माथ्यावर जेथे वडीलधारी छाया
 ...त्या वास्तूला म्हणायचे घर !

बोलल्याविनाही कळते जेथे भाषा
मोबदला नसतो वा नसते अभिलाषा
...त्या वास्तूला म्हणायचे घर !

होतात भांडणे खोटी; रुसवे लटके
त्यानंतर जेथे सारे हलके हलके...
...त्या वास्तूला म्हणायचे घर !

जी समानतेने दुःख वाटुनी घेते
जी इतरांनाही सौख्य मिळवुनी देते
...त्या वास्तूला म्हणायचे घर !

परस्परांचा परस्परांस उमाळा
निरपेक्षपणे जी देते प्रेम, जिव्हाळा
...त्या वास्तूला म्हणायचे घर !

साऱ्यांना मिळते फुलावयाची संधी
दरवळते जेथे शांती मंद सुगंधी
...त्या वास्तूला म्हणायचे घर !

* * *

तुम्ही पाहिली आहे का ही असली वास्तू ?
द्या, द्या तुमच्या ताण स्मृतीला; नीट आठवा !
अशी कुठे जर दिसून आली कधी कुणाला...
त्या वास्तूचा पत्ता नक्की मला पाठवा !!

* * *

- प्रदीप कुलकर्णी

..............................................
२ व ३ जानेवारी २००७
..............................................