सवत माझी लाडकी

माझी कविता आता माझी सवत झालीय,
कारण ती आता त्याला,
माझ्यापेक्षा आवडू लागलीय.

तो नेहमी म्हणतो,

"राणी, माझ्यावर तू कविता कर,
कवितेतून बरस माझ्यावर,
कवितेतूनच प्रेम कर."

माझा प्रश्न,

"राजा, फक्त तू एकदाच ठरव,
तुला मी आवडते की कविता?
याचं तू कोड सोडवं."

यावर त्याचं उत्तर,

"अग, तुच माझी कविता,
अन् तुच माझं गाणं;
तुझ्या सोबत आता,
फक्त तुझ्या कवितेतच जगणं."

खरचं, कळत नाही याला,
कवितेचं कसलं वेड लागलयं????
माझीच कविता आता
माझी सवत झालीय.

त्यादिवशी ,

त्यादिवशी तर कहरच झाला,

मला प्रेमाने जवळ घेत म्हणाला,

"मीही एक कविता केलीय,
आपल्या प्रेमाची गाथा मी, कवितेतूनच गायलीय."

खुशीने डोळे मिटून,
त्याच्या छातीवर डोकं ठेवलं,
तेवढ्यात त्याच्या खिशात
काहीतरी चौकोनी लागलं.

"तुझ्याच कवितांची वही,
राणी, मी माझ्या हृदयाजवळ ठेवलीय,
तुझ्याच कवितेतले शब्द चोरून,
आपली प्रेमकविता मी केलीय"

यावर उपाय म्हणून
मी आता कविता करत नाही,
पण तोही आता माझ्याशी,
कवितेशिवाय बोलत नाही.

नको नको त्या कल्पनेतून
कवितेतून तो बरसू लागलाय,
त्याच्या कवितेचा अर्थ लावताना
स्वर माझा बिघडू लागलाय.

पण तरीही,
त्याच्या कविता ऐकण्याची
आता मला सवय झालीय,
आता त्याच्या कवितेची
माझ्या कवितेशी मैत्री झालीय.