भोजशाळा ते भोजपूर

'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्य भारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यांत पारंगत होता. स्वतः लेखकही होता. त्याने अनेक पुस्तकेही लिहिली. या पुस्तकांचे विषयही अगदी शिल्पशास्त्रापासून ते साहित्यापर्यंत आहेत. भोजाविषयी उत्सुकता खूप दाटली होती. आणि एक दिवस अचानक धारला कूच केले.

धार हे पवारांचे संस्थान. पण ते अगदी अलीकडचे. त्याही आधी ते परमार वंशाच्या राजा भोजची राजधानी होते. या धार नगरीतच एकीकडे जसा दुसर्‍या बाजीरावाचा जन्म झालेला किल्ला भग्नावस्थेत इतिहासाचे ओझे खांद्यावर घेऊन उभा आहे. त्याचवेळी गावाच्या दुसर्‍या भागात हिंदू-मुसलमानांमधील रक्तरंजित संघर्षाचे डाग घेऊन 'भोजशाळा' उभी आहे. भोजशाळा. दोन वर्षांपूर्वी या भोजशाळेवरून हिंदू- मुसलमानांमध्ये झालेला संघर्ष माहिती होताच. त्यामुळे धारमध्ये आल्यानंतर या शाळेला भेट देणे क्रमप्राप्तच होते. गावाच्या एका कडेला भाजीबाजाराच्या पाठीशी ही भोजशाळा आहे.

शाळेला लागूनच मशीद आहे. शिवाय कबरस्तानही. शाळेच्या आवारात कुंपण घातले आहे. तिथे सुरक्षा व्यवस्था अगदी कडक. सगळी तपासणी करून आत सोडतात. आत गेल्यानंतर तर चक्रावलोच. मंदिराच्या भिंतीला अगदी खेटून मशीद. प्रत्यक्ष भोजशाळेत प्रवेश करतानाही कडक तपासणी झाली. आत गेलो. चार बाजूंनी मंडप असलेली मधले आवार मोकळे असलेली इमारत म्हणजे भोजशाळा. जवळपास हजारेक वर्ष जुनी. पुरातत्त्व खात्याने या शाळेतील खांब पूर्वीसारखे वाटतील असे उभे केलेले आहेत. भोजशाळा म्हणजे खरे तर सरस्वतीचे मंदिर. थोडक्यात त्याकाळचे विद्यापीठ. पण तिथे आता सरस्वतीचा साधा फोटोही नाही. उलट तिथल्या वास्तुशिल्पाला छेद देईल असे न शोभणार्‍या काळ्या संगमरवरी दगडात आयते मात्र कोरलेली आहेत.

या जागेत शुक्रवारी १ ते ३ या वेळेत हिंदूंना यायची बंदी असते. त्याचवेळी मंगळवारी दिवसभर मुसलमान येऊ शकत नाही. एरवी सगळ्यांना यायची मुभा आहे. हे व्हायचे कारणही उभय धर्मातला संघर्षच. एका शुक्रवारी वसंत पंचमी आली. हा या भागात फार मोठा सण आहे. त्या दिवशी उत्सव करण्यासाठी हिंदू उत्सुक होते. पण मुसलमानांचाही त्या दिवशी नमाज. दोघांत संघर्ष झडला आणि त्यातून रक्त सांडले. त्यातून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. तरीही अधुनमधुन चकमकी झडतच असतात. इथे असलेले सुरक्षा रक्षकही स्थानिक नाहीत. ते कुणालाही फार वेळ थांबू देत नाहीत. विद्यादानासाठी राजा भोजने बांधलेली वास्तू आता धार्मिक वादात अडकली आहे. विद्येचा वारसा जपण्याऐवजी वाद रंगला आहे, याने मन व्यथित झाले.
------------------------
राजा भोजाविषयीच्या माहितीत भोजपूरचा उल्लेख आला होता. हे भोजपूर म्हणजे भोपाळपासून जवळपास १८ किलोमीटरवर आहे. इथे म्हणे त्याने मोठे शिवमंदिर उभारण्याचे काम हाती घेतले होते. शिवाय एक मोठा तलाव बांधायला घेतला होता. या तलावाची रचना अशी केली होती की नैसर्गिक पद्धतीने पाणी फिरून येईल. हे मंदिर बघण्याची आस होती. सांची पाहून आल्यानंतर भोपाळमध्ये मुक्काम केलाच होता. दुसर्‍या दिवशी भोजपूरला निघालो. 'मध्य प्रदेश सडक परिवहन निगम'च्या अनुबंधित ट्रेवल्स बसने प्रवास करण्याचे 'दिव्य' पार पाडत अखेर आम्ही भोजपूरला पोहोचलो. एका टेकडीवर हे मंदिर आहे. मूळ मंदिर तर पार पडून गेले आहे. पण पुरातत्त्व खात्याने मूळ वाटावे असे मंदिर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. 'भिंत खचली कलथून खांब गेला'चा अनुभव पाहताना आला. मंदिर पुष्कळच भव्य आहे. त्याचे तुकडे जोडून ते रचण्याचा प्रयत्नही दिसून येतो. वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वांत उंच शिवलिंग या मंदिरात आहे. हे शिवलिंगही तुटले होते. पुरातत्त्व खात्याने जोडून ते उभारले आहे. मंदिरासमोर छुटपूट मंदिरे आहेत. त्याचे मस्तपैकी व्यावसायिकरण झाले आहे. मुख्य मंदिरात मात्र पुरातत्त्व खात्याने कोणतीही पूजा करायला बंदी घातलीय ही समाधानाची बाब. आजूबाजूला छान हिरवळ आहे.

त्याकाळी राजा भोजने बांधलेल्या तलावाचा अंदाज येतो. राजा भोज आजारी असताना येथे आला होता. विशिष्ट प्रकारे पडणार्‍या पाण्याने अंघोळ करावी असा सल्ला त्याला वैद्याने दिला होता. म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारा तलाव बांधला गेला होता. या तलावाचे बांधीव काठ आजही दिसून येतात. भोजपूरला येण्याआधीच त्याच्या संरक्षक भिंती दिसतात. त्यावरून तो किती मोठा असावा याचा अंदाज येतो. पण आता तलाव म्हणून काहीही शिल्लक नाही. इथेही मुस्लिम आक्रमकांनी मोठी भूमिका बजावली. होशंगाबादने हा तलाव मध्ययुगात फोडून टाकला होता. त्यामुळे त्यात पाणी साठणे बंद झाले. आता तर भौगोलिकच बदल भरपूर घडले आहेत.

हा सगळा छिन्नविछिन्न इतिहास पाहून फार वाईट वाटलं. हजार वर्षांच्या वास्तूही आपल्याकडे धड राहू शकल्या नाहीत. मंदिरांचे पडलेले अवयव पाहून व्यथित व्हायला होतं. इंदूरचे संग्रहालय मध्यंतरी पाहायला गेलो. त्यावेळी हजार, दोन हजार वर्षांपूर्वीच्या मूर्ती सरळ इमारतीच्या बाहेर ठेवलेल्या दिसल्या. पावसात त्या भिजत होत्या. तीच स्थिती धारच्या किल्ल्यातील किमती सामानाची आणि मांडूतल्या मौल्यवान शिल्पांची. लोकांची बेपवाई तर बोलायला नको. इंदूरमध्ये रहाणार्‍या अनेकांना भोजपूर माहीत नाही. आम्ही भोजपूरला जातो, गेलो हे सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तींच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिह्नांसहित विविध भाव पाहूनही त्रास व्हायचा. आपल्या इतिहासाचीच जर आपल्याला माहीत नसेल, तर वर्तमानात तरी आपण कसे जगतो असा प्रश्न पडतो. एकुणात काय हे सगळं पाहिल्यानंतर उगाचच उदास होऊन परतलो.