सर्सर आल्या सरीत...

सर्सर आल्या सरीत कोणी दोन मैत्रिणी

शोधत होत्या एक आसरा, त्या ओल्या क्षणि!

डोक्यावरुनी घेत ओढणी चालत भरभर

जशा सरी त्या येतच होत्या सर्सर सर्सर !

चेहऱ्यावरती चिंता होती चिंब तनांची

मनात गणिते चालू आणिक क्षणाक्षणांची!

शोधक नजरा, अंगचोरट्या, थर्थर देही

ओघळणारे थेंब टपोरे सचिंत तेही!

वारा वाहे, उठे शिरशिरी चिंब तनातून

ओला श्रावण हळूच डोकावला मनातून!

मनात भरता श्रावण कोणा हवा अडोसा?

चिंब भिजावे, ओलेती बोलावी भाषा !

त्या थेंबांशी  हितगुज व्हावे छान टपोरे

अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे !

म्हणून भिजल्या सरीत अवखळ,दोन मैत्रिणी

होउन गेल्या चिंब चिंब त्या थेंब श्रावणी!