पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस

पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस

नुकतेच प्रा. प्रवीण दवणे यांचे "सूर्य पेरणारा माणूस" नावाचे पुस्तक वाचनात आले. प्रकाशक: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था), प्रथमावृत्तीः ८ मे २००८, मूल्यः रु. १००/- फक्त. विस्मयकारक नावाच्या, या पुस्तकात विस्मयचकित करणाऱ्या एका आयुष्याचा आलेख साकारला आहे. उण्यापुऱ्या एका दशकाच्या कालावधीत नव्या मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेल्या "हावरे बिल्डर्स" चे संस्थापक कै. सतीश काशिनाथ हावरे यांचे ते चरित्र आहे. आजमितीस 'हावरे बिल्डर्स' दररोज दहा-बारा घरे आणि दुकानांचा ताबा ग्राहकास सुपूर्त करत आहेत. नव्या मुंबईच्या क्षितिजरेषेवरच त्यांनी 'हावरे' नाव कोरले आहे. बांधकामक्षेत्रात सर्वात गतिमान आणि विश्वासार्ह व्यवसाय समर्थपणे प्रस्थापित करून ग्राहकांच्या पसंतीस पोहोचवणाऱ्या मराठी मातीतल्या उद्योजकाची ही यशोगाथा आहे. उद्योजकतेची आस मनात धरून समोर येणाऱ्या होतकरू मराठी तरुणांना, आयुष्य घडवावे कसे ह्याचा वस्तुपाठ म्हणून ते उपयोगी ठरू शकेल याचा विश्वास वाटतो.

दुवा क्र. १: हावरे डॉट कॉम  या त्यांच्या संकेतस्थळावर आता या पुस्तकाचे 'वि-पुस्तक (e-book)' आविष्करण निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. वाचकांनी ते अवश्य वाचावे आणि उद्योजकतेचा मार्ग गवसतो का ह्याची चाचपणी करावी. मार्ग नाही तरी दिशा अवश्य मिळू शकेल. किमान प्रेरणा तर खासच.

दुवा क्र. २: 'सूर्य पेरणारा माणूस'

दवणे म्हणतात, "जिद्दीच्या बिया घेऊन सतीश हावरे नावाचा 'सूर्य पेरणारा माणूस' आकाशावर आपली नाममुद्रा कोरून गेला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक धडपडणाऱ्या युवकाला जिद्दीच्या बिया देण्याचे मोलाचे काम सतीश हावरे यांच्या आयुष्याने केलेले आहे. इमारती उभ्या करतांना, हजारो उपेक्षितांची, आयुष्ये उभी करणाऱ्या सतीश हावरे यांचे अजिंक्य जीवन नियतीलाही पुसता आले नाही. विदर्भातील पथ्रोट या छोट्या गावातून नव्या मुंबईतील 'हावरे बिल्डर्स'पर्यंतचा हा गगनचुंबी प्रवास. प्रत्येक पालकासाठी! प्रत्येक शिक्षकासाठी! जिंकू इच्छिणाऱ्या प्रत्येक कोवळ्या मनासाठी! "