एग करी

  • ६ अंडी, ३-४ मध्यम आकाराचे कांदे, अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं, अर्धी वाटी खोवलेला ओला नारळ, ६-७ लसूण पाकळ्या,
  • ५-६ सुक्या लाल मिरच्या ( १० मिनिटे गरम पाण्यात भिजवून घ्याव्यात. जमल्यास काश्मिरी मिरच्या घ्याव्यात म्हणजे सुरेख लाल रंग येतो)
  • अर्धा चमचा कांदा- लसूण मसाला, अर्धा चमचा मालवणी मसाला,
  • चवीनुसार मीठ, फोडणीचे साहित्य, तेल.
१ तास
२-३ जणांसाठी

अंडी उकडून घ्यावीत. कांदे बारीक चिरून तेलावर तळून घ्यावेत. सुकं आणि ओलं खोबरं कोरडं थोडंसं भाजून घ्यावं. तळलेला कांदा, भाजून घेतलेलं खोबरं, लसूण पाकळ्या, लाल मिरच्या, दोन्ही मसाले एकत्र करून मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यावे. पॅनमध्ये तेल तापवून त्यात थोडा हिंग आणि हळद घालावी. नंतर वाटलेली मसाल्याची गोळी घालून तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यावी. आवश्यकतेनुसार पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालून एक उकळी आणावी. उकडलेल्या अंड्यांचे तुकडे करून अथवा अंड्याला लहान लहान चिरा पाडून अंडी ग्रेव्हीत सोडावीत. झाकण ठेवून एक चांगली उकळी आणावी. सर्व्ह करताना वरून चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

कांदा तळून घेण्याऐवजी कूकरमध्ये उकडून घेतला तरी सुद्धा चालतो. चवीत फरक पडत नाही. कांदा कूकरला लावून ३ शिट्ट्या करून घ्याव्यात. कॅलरी कॉन्शस लोकांसाठी हा पर्याय आहे. सुक्या मिरच्यांऐवजी लाल तिखट वापरले तरी चालते. किसलेल्या सुक्या खोबऱ्याऐवजी सुक्या खोबऱ्याचा तुकडा गॅसवर भाजून घेतला तरी छान खमंगपणा येतो.

मैत्रीण