अप्पा

एस. टी. मधून सचिन उतरला तेव्हा रात्रीचे ११:३० होत आले होते. एस. टी. चे धक्के खाऊन त्याचा जीव आंबलेला होता, त्यात गाडी बिघडल्याने विनाकारण गाडीने २ तास उशीर लावला. पावसाचीपण रिमझीम सुरू होती. एकंदर वातावरण कुंदच होतं. त्याला पुढच्या गावाला जायचं होतं, ते गाव सुमारे १५ किमी. लांब होतं.

त्याने गाडीची चौकशी करायला सुरुवात केली. काही रिकाम्या गाड्या उभ्या होत्या, पण त्या तिकडे जायला तयार होत नव्हत्या. त्याची अडचण लक्षात घेऊन शेवटी त्यांच्यातला एक जण म्हणाला.

"सायेब, हिथनं ३ किलोमीटरवर येक फाटा हाये! तिथनं तुम्ही जा. तिथनं तुम्हाला दुसरी गाडी भेटेल!! पर सायेब रस्ता लै खराब हाये, रातच्याला जायला भ्या वाटतं!!!! "

थोडंसं पुढे गेल्यावर कदाचित एखादी गाडी मिळेल ह्या आशेवर आंबलेल्या अंगानं सचिनने पायपीट सुरू केली. आजूबाजूला भयाण शांतता होती. त्या भयाण शांततेत रातकिडेच काय ते ओरडत होते. आजूबाजूला दाट नारळी-पोफळीची झाडी, डाव्या बाजूला दूरवर रोरावणारा समुद्र, अमावास्येचा अंधार आणि पाऊस. एकंदर वातावरण भयानकच होतं.  त्यात त्याच्या लक्षात आलं की आजची अमावस्या साधी नाही. सर्वपित्री अमावस्या!! त्या दिवशी म्हणे स्वर्गातली पितरे खाली तर्पणासाठी खाली येतात. मनात विचार आल्यावर त्याच्या अंगावर काटा आला. भीतीची एक शिराशिरी त्याच्या अंगावर उठली. मनातले विचार त्याने झटकले. चालण्याचा वेग आपोआप वाढला. भुता खेतांवर विश्वास जरी नसला तरी वातावरणाचा परिणाम त्याच्यावर झाला होता. एकट्याने जाण्यापेक्षा रात्री गावातच मुक्काम करायला हवा होता असं त्याला वाटायला लागलं. किमान एखादा सहप्रवासी तरी हवा होता.

चालता-चालता तो आतापर्यंत बराच पुढे आला होता. गाव सुटून बरंच अंतर झालं होतं. उजव्या बाजूला, दूरवर, पुढे त्याला काहीतरी जळताना दिसत होतं. कदाचित कोणीतरी शेकोटी पेटवली असावी. त्याने त्या दिशेला जायला सुरुवात केली. एखाद्या चहाची सोय झाली तर ते सुद्धा त्याला हवं होतं. त्या बाजूला जाण्यासाठी उजव्या हाताला वळला. मोकळी जागा पार करून तो तिथे पोहचला. ती जळणारी शेकोटी प्रत्यक्षात एक चिता होती. त्याच्या ते लक्षात आल्यावर त्याने मागे वळून परत चालायला सुरुवात केली. एक अभागी जीव, पुढच्या प्रवासाला निघाला होता. त्याने मागे वळून परत एकदा बघितलं. वाऱ्याने ज्वाळा हालत होत्या. धुराचे लोट उठत होते.

परत चालायला सुरुवात करणार इतक्यात त्याला काहीतरी जाणवलं. त्या चितेतून एक धुरकट आकृती झोपेतून उठल्या सारखी बाहेर पडली. तो थिजल्या सारखा उभा राहिला. ती आकृती त्याच्या दिशेने येत होती. ओरडावंसं वाटत होतं पण शब्दच बाहेर पडत नव्हते. ती आकृती जवळ आली. अचानक दिसेनाशी झाली. पाहिलं ते सत्य का भास याचा विचार करता करता अचानक त्याच्या खांद्यावर कुणाचातरी हात पडला. दचकून हातातली बॅग खाली पडली. श्वास फुलून गेला. मागे वळून जिवाच्या आकांताने त्याने किंकाळी फोडली.

हातात कंदील घेऊन कोणीतरी उभं होतं. त्या व्यक्तीने कंदील वर केला.

"काय झालं??" त्या व्यक्तीने विचारलं.

सचिनने मागे वळून बघितलं. मघाची धुरकट आकृती दिसत नव्हती. चिता शांतपणे जळत होती.

"तिथे एक आकृती... चितेतून बाहेर आली... चालत, माझ्या पर्यंत.." सचिन म्हणाला.

त्या व्यक्तीने एकवार सचिन कडे आणि एकवार चिते कडे बघितलं. मग ती व्यक्ती तिथपर्यंत गेली. एकदोन लाकडं नीट करून ती परत आली.

त्यांनी कंदील वर करून सचिन समोर धरला. सचिन आता थोडा सावरला होता. दोघांनी कंदिलाच्या पिवळट प्रकाशात एकमेकांना न्याहाळलं. ती व्यक्ती उंच होती. बऱ्यापैकी वयस्कर. जवळपास ७०. पण भक्कम शरीरयष्टी. पांढरं धोतर, सदरा. कपाळाला भस्माचे पट्टे ओढलेले. डोळे पिंगट. नजर भेदक. ह्या माणसाला मनं सुद्धा वाचता येईल असा विचार सचिनच्या मनात येऊन गेला.

"चला!! " ती व्यक्ती म्हणाली. तीच्या मागे सचिन चालू लागला. ती व्यक्ती भराभर पावलं उचलत होती. तीच्या बरोबरीने चालणं त्याला जड जात होतं.

त्या व्यक्तीने त्याच्या घाबरण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. उलट चितेपर्यंत जाऊन तिचे लाकडं सारखी केली. त्याला भास झाला असं कदाचित त्या व्यक्तीला सुचवायचं असावं.

"कुठे जायचंय?" त्या व्यक्तीने विचारलं.

"मला फाट्यापर्यंत जायचंय.. तिथून पुढे शंकरवाडी."

"हम्म!!! मी इथेच पुढे राहतो. मला अप्पा म्हणतात. तुला फाट्या पर्यंत सोबत देतो."

सचिनला जरा हायसं वाटलं. आधीच्या अनुभवाची भिती अजून त्याच्या मनातून गेली नव्हती.

अप्पांनी त्याची अजून जुजबी चौकशी केली.

"तू रात्रीचं इकडे यायला नको होतं. निदान आज तर अजिबात नाही." अप्पा म्हणाले.

सचिन गोंधळून गेला. आतापर्यंत ज्याला तो भास मानायला लागला होता, ते सत्य होतं की काय ह्याची भीती त्याला वाटायला लागली.

"तुम्ही बाहेरगावचे. त्यात शहरी, तरुण, अननुभवी. गावच्या वातावरणाचा अनुभव नाही. शिवाय शिकलेले. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या चष्म्यातून बघणारे. देवाला सुद्धा न मानणारे. अमावस्या, पौर्णिमा.. भूत-प्रेत!! काहीच न मानणारे...."

"म्हणजे अप्पा? मघाशी मी बघितलं ते???? "

त्यावर अप्पा काहीच बोलले नाही. त्यांनी फक्त कंदिलाची वात मोठी केली. सचिनची भीती अजून वाढली.

अचानक जोराचा वारा आला आणि कंदील विझून गेला. वात पेटवायला ते जरा थांबले. इतक्यात कुठूनतरी २-४ कुत्रे भुंकत आले. जवळ आल्यावर मात्र ते बिचकले. थोडेसे लांब उभे राहून रडल्यासारखा आवाज काढू लागले. सचिनला हा सर्व प्रकार एक अपशकूनच वाटला. 

अप्पांनी कंदील पेटवला. कुत्र्यांकडे एकवार बघितलं. ते जसे अचानक आले तसे निघून गेले. दोघांनी परत प्रवासाला सुरुवात केली. १.५ किमी अजून जायचं. सचिनने विचार केला.

"तुला लौकर पोहचायचं असेल, तर मला जवळचा रस्ता माहीत आहे." अप्पा म्हणाले. बहुतेक त्याच्या मनातलं त्यांना ऐकू गेलं.

"नाही, तसं काही नाही." सचिन म्हणाला.

थोडंसं पुढे गेल्यावर अप्पांनी एक पायवाट घेतली. थोड्याच वेळात ते दाट झाडी असलेल्या भागातून जाऊ लागले. जाता-जाता अप्पा अचानक थबकले. सचिनला पण त्यांनी थांबवलं. सळ-सळ आवाज करत काहीतरी त्यांच्या पुढ्यातून गेलं. आता मात्र सचिनचा धीर सुटायला लागला. वाट फुटेल तिकडे पळून जावंसं वाटायला लागलं.

"आता मागे फिरून काही फायदा नाही. पुढेच जावं लागेल. " अप्पा मनकवडे तर नाहीत ना असं सचिनला वाटायला लागलं होतं. त्यांच्या एकंदर गूढ व्यक्तिमत्त्वाची त्याला आता भीती वाटायला लागली.

अजून अर्धातास चालल्यानंतर ते परत मुख्य रस्त्याला लागले. सचिनला हायसं वाटलं. अप्पा परत थांबले.

"इथून आता तुला गाडी मिळेल. हे घे. हे तुझ्या जवळ ठेव. उद्या आठवणीने नदीत विसर्जित कर."

अप्पांनी धातूची एक गरम वस्तू सचिनच्या हातात दिली. कंदिलाच्या उजेडात ती एक तांब्याची वस्तू असल्याचं त्याला जाणवलं.

"काय आहे हे? " त्याने विचारलं.

"एका पुण्यात्म्याच्या चितेचं भस्म!! याचा योग्य तो आदर ठेव." त्या थंडीत सुद्धा सचिनला घाम फुटला.

अचानक एक जीप आवाज करत त्यांच्या समोर येऊन बंद होऊन थांबली. अप्पांनी खूण केली. सचिनने पुढे होत ड्रायव्हरला गाठलं. सचिनच्या अनपेक्षित दर्शनाने तो दचकला. मग त्याने त्याला शेजारी बसायला लावलं.

सचिनला काय वाटलं कोणास ठाऊक. पण तो परत अप्पांपाशी आला. त्यांना नमस्कार केला.

"आयुष्यमान भव!! "

"साहेब!! काय करताहात? चला!!! "

"ठीक आहे अप्पा, येतो !!! "

"साहेब, फोनवर नंतर बोला पहिले चला.. "

सचिन आतमध्ये येऊन बसला. जीप निघाली. जाता-जाता त्याने अप्पांना हात केला.

"साहेब कोणाला हात केला?? आणि ह्या जंगलात तुमचा फोन कसा चालू?"

"फोन?? अरे मी तर अप्पांशी बोलत होतो?? "

"अप्पा????? " ड्रायव्हर काहीच नंतर काहीच बोलला नाही. फक्त त्याने कुठे जायचं तेव्हढं विचारलं. त्याने मित्राचं, सुरेशचं नाव सांगताच त्याचा चेहरा परत बदलला.

एकदाचे ते सुरेशच्या घरापाशी पोहोचले. सुरेश बाहेर आला. ड्रायव्हर त्याला बाजूला घेऊन काहीतरी बोलला आणि निघून गेला.

थोडंसं खाऊन सचिन ने सरळ झोपून घेतलं. सुरेशनेच त्याला आराम करायला लावला.

सकाळी उठल्यावर सचिनने त्याला सर्व हकिगत सांगितली. सुरेशने ऐकून घेतली, पण काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने ते सुरेशच्या जुन्या वाड्याकडे निघाले. ह्या वाड्याच्या दुरुस्तीसाठी सचिन आला होता.

सुरेशने वाड्याचं दार उघडलं. दोघे दिवाणखान्यात आले. आत आल्यावर सचिनला वाड्याच्या वैभवाची कल्पना आली. दिवाणखान्यावर नजर फिरवता-फिरवता अचानक त्याची नजर एका तसबिरीवर खिळली.

"सुरेश, अप्पा!!! "

"तुझा आणि अप्पांचा काय संबंध?? " सचिनने विचारलं.

सुरेशने सांगायला सुरुवात केली.

******************************************************************

"आमचं घराणं मांत्रिकाचं. पण आम्ही त्याचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठी करत असू. आमच्या कामासाठी त्याचा वापर करण्यावर आम्हाला बंदी होती. पण एकदा माझ्या वडलांनी, अप्पांनी त्याचा उपयोग त्यांच्या कामासाठी केला. त्या चुकी बद्दल त्यांच्या गुरूंनी त्यांना लौकर मुक्ती न मिळण्याचा शाप दिला. वडिलांची तशी फार मोठी चूक नव्हती, फक्त नेहमी पाळलं जाणारं एक पथ्य त्यांच्या कडून मोडलं गेलं. मरताना त्यांनी मला त्याच्या अस्थी ११ तांब्याच्या छोट्या पेट्यांमध्ये भरून ठेवायला लावल्या. त्या पेट्या ह्याच वाड्याच्या देवाघरापाशी ठेवलेल्या असायच्या. हळूहळू एक-एक पेटी आपोआप कमी होत गेली. शेवटची पेटी तुला मिळाली. हिच्या विसर्जनाबरोबर, अप्पांना मुक्ती मिळेल."

सचिनला हळूहळू सगळं लक्षात यायला लागलं. चितेपाशी वळल्यावर त्याला आजूबाजूला कोणीच दिसलं नव्हतं. अप्पा तेव्हा आकृती पासून वाचवायला तिथे प्रकट झाले. कुत्र्याचं थांबलेलं भुंकणं, सापाचं जाणं समजणे, जीपच्या येण्याची माहिती आणि ड्रायव्हरला त्यांचं न दिसणं ह्या सगळ्याचा त्याला उलगडा झाला.

वाड्याच्या बाहेर पडताना त्याने मनोभावे त्यांच्या तसबिरीला नमस्कार केला. अस्थि-विसर्जन करताना दोघांचे डोळे भरून आले.