पाऊस

पागोळ्यांच्या आवाजात पाऊस बोलतो
झावळ्यांच्या संगेसंगे पाऊस डोलतो

कधी विलंबित ख्याल कधी रॅप गाणे
स्वतःच्याच गाण्यामध्ये पाऊस रंगतो

'विसरुनी जा दु:खाला' सांगुनी कानात
वाळूतले तुझे नाव पाऊस खोडतो

आज पावसाचा रंग वेगळा वेगळा
रागावला बाप तसा पाऊस झोडतो

व्रात्यपणात ना त्याचा हात धरे कोणी
तुला ओलेती करून पाऊस हासतो

रागावू नकोस बघ तुझ्यामाझ्यामध्ये
इंद्रधनुष्याचा पूल पाऊस बांधतो

दंगा करूनिया पोर शांत व्हावे तसे
अळवाच्या पानावर पाऊस झोपतो

इतके न पावसाचे वेड लागो कोणा
पापणीत रोज आता पाऊस साचतो