आजही मी..?

आजही मी..?

असं काही करू नका
मला नाही म्हणू नका.

हाडामासांची वस्तू आहे
वाट्टेल तशी तासून घ्या
असतील-नसतील तेवढ्या तुमच्या
कसोट्यांवर घासून घ्या!

नाचता येतं, गाता येतं
शिवण टिपण करता येतं
स्वयंपाक-पाणी, आला गेला
चित्रसुद्धा काढता येतं!

रूप फक्‍त हातचं नसतं
तरी सुद्धा सजलं आहे
खोटं असलं तरी सुद्धा
डोक्यात फूल खोचलं आहे.

चहा पोहे मीच केले
कुशनसुद्धा मीच केले
दारावरचे पायपुसणे?
तेही विणून मीच केले

तुम्ही सांगा, तशीच राहील
तेच बोलेल, तेच पाहील
पहिल्या श्रेणीत पास होऊन
सांगितलं तर घरीच राहीन

भाग्य माझं वाट बघतं
पुन्हा दार लोटू नका
कस्सही करा पायापाशी
धूळ नाही म्हणू नका

—मनीषा साधू