ई-पत्रामधून मिळालेली कविता सर्व मनोगतींकरता देत आहे.
************************************
मी इथे काय मिस करतोय?
रोज सकाळी दारात येणारी चितळ्यांची दुधाची पिशवी...
वरच्या मजल्यावरच्या कुंडीत भिरकावलेला 'सकाळ'...
रविवारी सकाळी "किती उशीरा उठलास.. " म्हणत आईने ठेवलेले पॅटिस...
आंघोळीच्या आधी टपरीवर जाऊन प्यायलेला कटिंग चहा...
लोळत लोळत ऐकलेली 'रंगोली' ची गाणी...
क्रिकेटसाठी आलेली मित्रांची शिट्टी...
तव्यावरून ताटात येणारी गरमा गरम पोळी...
रविवारी दुपारी झोपायच्या तयारीने उघडलेले 'म. टा. ' चे पान...
शेवटच्या पानावर येणारी क्रिकेटची बातमी...
हॉटेलमध्ये जाताच मिळणारे गार गार पाणी...
शंभर रुपयांच्या गॉगलसाठी एच. के. लेन मध्ये केलेले बारगेन...
हात न दाखवता मारलेला राइट टर्न...
रस्त्याच्या मधून आडमुठेपणे जाणारे रिक्षेवाले...
मोकाट पळणारी कुत्री आणि रस्त्यात बसलेल्या गाई...
थिएटर बाहेर 'पांच का दस' करणारे...
हिरॉईनच्या पहिल्या शॉटवर शिट्या मारणारे...
'खैबर' चे पान खाऊन टपरीजवळच्या डब्यात मारलेली पानाची...
चांदणी चौकात काढलेली शनिवारची रात्र...
अजून काय मिस करतोय?
उघड्या असलेल्या दारे-खिडक्यातून मोकळेपणाने वाहणारा वारा...
नवीन घरात राहायला आल्यावर शेजारच्यांनी केलेली विचारपूस...
संध्याकाळच्या वेळी देवळात जाणारे आजी-आजोबा...
पावसात न्हाऊन निघालेली ज्ञानोबा-तुकोबाची पालखी...
गणपती-दसरा-दिवाळी-गुढीपाडवा-रंगपंचमी...
खरं सांगू... ह्या सर्व गोष्टींपेक्षा सुद्धा जास्त मी काय मिस करतोय?
आपल्या माणसांची आपुलकी !!!