साध्य

ट्रिंग ट्रिंग... टेलिफोनची बेल खणखणली... सहेबांनी फोन उचलला..
तिकडून आवाज आला, " साहेब, संध्याकाळी येताय न? " साहेब उत्तरले-
"हो हो, उद्या आहे ना ऑपरेशन.. येतो मी संध्याकाळी". त्यांनी पत्ता निट लिहून घेतला.
महत्वाच्या गोष्टी नमूद केल्यात. ठरल्या प्रमाणे ते संध्याकाळी दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोहचलेत.

         समोर एक पंचेचाळीशी पन्नासीचे गृहस्थ होते. बाजुला त्यांची पत्नी आणि साधारणत: विशीची
त्यांची मुलगी उभी होती. साहेब आत गेलेत. "पेशंट नं ११२ आपणच ना? " असं म्हणत साहेबांनी पेशंटची
ओळख करून घेतली. समोर आलेला अनोळखी माणूस पाहून पेशंट नो ११२ जरा गांगरलेच, पण लगेच सावरत
त्यांनी साहेबांना बसायला सांगितलं.

       साहेब बोलू लागले " सधारण पणे २५ वर्षांपुर्वीची गोष्ट. किंचित गाठ आली म्हणून डॉक्टरकडे
गेलो. साध्या वाटणा-या गाठीचं रहस्य डॉक्टरांनी उलगडलं ते कॅन्सर म्हणून. " पेशंट ला साहेबांच बोलणं वेगळं
आहे हे समजत होतं तरीही ते ऐकून घेत होते. साहेब बोलू लागले.. " कॅन्सर... नाव ऐकताच डोकं सुन्न झालं.
काय करावं कळेना.. नजरेसमोर आलीत ती बायका पोरं.. घरदार... " पेशंट नं ११२ ने मान हलवून संमती दिली.
आपण देखिल याच परिस्थितीतून जात असल्याची जाणीव झाली त्यांना.

  साहेब पुढे बोलू लागले.. "कसंतरी घरच्यांना सांगायला हवं होतं... बोलवत नव्हतं पण ईलाजही नव्हता..
समजवलं बायकोला... आपल्यासमोर संकट आहे आणि त्याला सामोरं जायला हवं आहे.. तू माझ्यासोबत
खंबीर पणे उभी राहा... होईल सगळं व्यवस्थित.. " पेशंट नं ११२ च्या पत्नी स्थीरावल्या.. पुढे ऐकू लागल्या..
"डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं, मुंबईला जायचं ठरलं.. लहान लहान मुलांना इथेच, नागपुरात ठेऊन मुंबईला
निघालो आम्ही दोघं नवरा बायको.. सोबत एक दोन अजून होतेच... मनात धाकधुक होत होती.. कॅन्सर ने हातपाय
पसरण्याच्या आत त्याला दूर फेकून द्यायचं होतं. " हा माणूस आपलीच कथा आपल्याला सांगतोय् असं काहिसं
पेशंट नं ११२ ला वाटू लागलं... साहेब पुढे बोलू लागले.. "ठरल्या प्रमाणे ऑपरेशन पार पडलं, sound box
काढून टाकावा लागला, आवाज गेला, पण जीव वाचला... मात्र खरा त्रास नंतर सुरू झाला.. ऑपरेशनचा नाही
बरं, सांगतो.. सांगतो.. " साहेबांनी घोटभर पाणी घेतलं, आणि मग ते बोलायला लागले..

आता पेशंट नं ११२ ला ते "आपले" वाटत होते... त्यांचा परिवार मन लावून साहेबांचं बोलणं ऐकत होता.
"तो त्रास असा... माझा आवाज गेलेला... मला आणि लोकांनाही याची सवय व्हायला वेळ लागणार होता.
मी काय बोलतोय ते लोकांना समजतच नसे.. मग हातवारे करून, निरनिराळे पदार्थ दाखवून, कधी लिहून
दाखवून ते समजवायला लागायचं.. मी माझी कामं अशीच करत असे.. ती थोडीच सोडता येतात!.. खर सांगतो पेशंट
नं ११२.. हाच काळ काय तो "काढावा" लागतो. इथे मनाची पावलं डगमगू द्यायची नाहीत. लोक मला
अतिसाहनुभुती दाखवायचेत.. माझ्यात न्यूनगंडाची भावना तयार व्हायला लागली... काही वेळेस तर लोक
मला वेडा समजून चेष्टा करीत.. काही वेळेस मूक बधिर समजून हातवा-यांने बोलत...
त्यामुळे मला त्रास होऊन मी इतरांमध्ये  मिसळेनासा
व्हायला लागलो, पण इथे पाळायचा तो संयम. लोकांशी बोलणं टाळलं तर फिजिओथेरपी ची प्रॅक्टीस कशी होणार?
मग मला एक माणुस भेटला. तो मला कधी सहानुभुती दाखवत नसे की कधी चेष्टा करित नसे.. तास अन तास
मी त्याच्याशी बोलायचो.. हवं तितकं.. हवं तेवढं.. घरची मंडळी देखिल सोबत होतीच माझ्या.. माझं ऑपरेशन
हे ह्या प्रकाराचं नागपुरातलं पहिलंच ऑपरेशन होतं त्यामुळे अशा प्रकारचा आवाज नसलेला व्यक्ती पाहण्याची
सवयच नव्हती कुणाला पण आता सगळ्यांना सवय झालीय.. माझी जितकी मदत त्या माणसाने केली
तितकी कुणीच केली नाही... हे सगळं तुम्हाला सांगतोय ते तुम्ही पण या सर्वातून जाणार आहात म्हणून!
पण पेशंट, काळजी अजिबात करायची नाही... दोन गोष्टी महत्वाच्या.. एक संयम आणि दुसरी श्रद्धा...
द्या बाकी सोडून सगळं... अहो माझ्याजवळ असं सांगायला कुणिच नव्हतं.. तुमच्या जवळ तर दोन जण आहेत मदतीला.. "

"दोन? दोन कोण" पेशंट उद्गारले... " अरे हो एक मिनिट हं.. दुस-याशी ओळख करून द्यायची राहिली" असं म्हणत
साहेबांनी एक पाकिट बाहेर काढलं आणि पेशंट च्या हातात दिलं... आज नाही उघडायचं.. मग.. ऑपरेशन झाल्यावर..
बरं का... हा माझा नंबर घ्या... काही लागलं तर कळवा.. येतो, अजून एकदोन पेशंट आहेत, त्यांना भेट देतो.
 साहेब निघाले.. पेशंट ला खूप हलकं वाटत होतं, ताण कमी झाला होता.. आणि एक आश्चर्य होतं
ओळख पाळख नसलेला हा माणुस आला, बोलला, काय साधलं यानी?

पेशंट चं ऑपरेशन व्यवस्थित आटोपलं.. सहेबांनी सांगितल्याप्रमाणे पेशंट नि नंतर ते पाकिट उघडलं, त्यात एक
आरसा होता. साहेबांची आठ्वण झाली आणि पेशंट नि स्वत:ला पूर्णपणे तयार केलं.

साहेबांच्या भेटी अशाच सुरू होत्या.. एक दिवस सकाळिच त्यांना फोन आला... सहेबांनी फोन उचलला
"कोण? " पलिकडून आवाज आला "साहेब उद्या सकाळी ऑपरेशन आहे, मी पत्ता लिहून घेतलाय, तुम्ही पण
लिहून घ्या... उद्या भेटू" साहेबांनी विचारलं "कोण बोलतय? " उत्तर आलं "तुम्ही मला दिलेला माणूस
आता मी उद्या देणार त्या पेशंट ला... पेशंट नं ११२ कडून भेट"

साहेबांनी काय साधलं ते पेशंट नं ११२ ना समजलं होतं..