फोनची रींग खणखणली. तिनी सवयीनं फोन उचलला " हॅलो.. हुं.. हुं.... " नुसत निर्विकार होकारार्थी हुंकार! समोरच्या च्या बोलण्यातून असं काय जाणवत होतं तिला तिच जाणे, पण तिचा चेहरा अगदी शांत होता.. काही वेळ. मग मात्र तीच्या चेहे-यावरच्या रेषा बदलायला लागल्यात. हळू हळू तिचे बोलके डोळे पाणावले, ती काहीच बोलत नव्हती पण तिचा चेहरा तिची मनस्थिती तंतोतंत सांगत होता. आज कितीतरी दिवसांनंतर तिला हंवं असणारं काही तरी बहुधा
तिला मिळणार होतं. तिच्या चेह-यावरून आनंदाश्रू वाहत होते खरे, पण तिच्या अवाजातला कणखर पणा कायम होता.. "विचारू की नको?, नाही तर पुन्हा काहीतरी बिनसायचं! " ती स्वतलाच विचारत होती मनातल्या मनात... " विश्वास नाही असं नाहीये रे पण, नाही झालं तर? नाहीच जमलं पुन्हा तर".. काय बोलावं सुचतच नव्हतं तीला.. तरी हिम्मत करून एकच शब्द बोलली ती.. "नक्की नं? " समोरून येणा-या उत्तरानंतर पुन्हा एकदा तिचे डोळे जरा लवले.... "बघ, घाई नाहीये, जसं जमेल तसं"
खरं तर हे बोलावं अशी तिची इच्छा ही नव्हती, आणि मनस्थिती ही! पण बरेचदा ब-याच गोष्टी मनाविरुद्ध कराव्याच लागतात, त्यातलीच ही एक!
मनाला समजवत तीनी फोन बंद केला. समोरच्या खुर्चीवर हातात मासिक घेऊन बसली खरी, पण मन थोडीच वाचनात लागणारे? आजवर झालेली एक एक गोष्ट तीला आठवू लागली, अगदी ताजी असल्यासारखी.... ते हळुवार बोलणं, ते न बोलता नजरेतून सारं सारं सांगणं, ते रात्रभर जागणं, जागून झाल्यावरही ते पहाटे पहाटे फिरायला जाणं,फिरता फिरता ते पाय मुरगळण्याचं नाटक, मग मुद्दामच जास्त वेळ सोबत राहता यावं म्हणून ते बाकावर बसणं..... एक एक गोष्ट स्पष्ट होतीच तिच्या नजरे समोर..
या सा-याचा अर्थ तीला समजत होता, आवडत देखील होता... हा वेळ कधी जाऊच नये असं वाटणं स्वाभाविक होतंच न?
तीला ती पहीली भेट चांगलीच लक्षात होती.. नवीन ओळख नसल्यासारखं ते बोलणं.. जणू रोजच बोलावं इतकं मोकळं! स्वभावानेही सुस्वभावी, निष्पाप आणि आकर्शक असं ते व्यक्तिमत्व, मग कुणाला नाही आवडणार? पण इथे विषेश असं की, तिच्यासारखी साधी सरळ, सर्वसामान्य मुलगी, ना रंग न रुप, ती देखील आवडू शकते कुणाला यावर विश्वासच बसेना तिचा... पण पण बहुधा ते खरं होतं, ती आवडली होतीच... कारण ते स्पष्ट दिसतं होतं ना नजरेतून, वागण्या बोलण्यातून!!
नजरे नजरे मध्ये कधीच सारं बोलून झालं होतं! मग आता तेच ते पुन्हा काय बोलायचं...
ती परत यायला निघाली तेव्हा तिनी डोळे पुन्हा वाचले, त्यात अजूनही तेच प्रेम, तेच भाव दिसत होते तीला... एक हलका इशारा तिनी ओळखला आणि मग फोनवर बोलणं सुरू झालं.. मग रोजचंच.. अजूनही तितकं मोकळं बोलत नसे ती... पण रोज बोलणं व्हायचच.. असच... पण उगाच नव्हे!! त्या बोलण्यातली ओढ भेटीकडे वळणार हे निश्चितच होतं. तसं ते तीलाही हवंच होतं... कधी शक्य होतय हेच बघायचं....'well whenever there is a will, there is a way' भेट होणार होतीच......
खुर्चीवर बसल्या बसल्या तीचा कधी डोळा लागला तिला कळलच नाही... दारावरच्या बेल नि जाग आली.. "हो हो आले आले.. ओह!!! धोबी काका, तुम्ही? "
कपडे घेता घेता तिनी घड्याळ्याकडे पाहीलं.. " हे काय, फक्त साडेपाच?... अजून तब्बल तीन तास आहेत, छे, किती वाट पाहतेय मी" स्वत:शीच पुटपुटत कामाला लागली.."आज वांगे करुया, आणि काकडीची कोशींबीर.. मलाईचं दही घालून"... ठरला, बेत तर ठरला.. "हो पण आता आवरायला हवं.. थोडं मार्केटला जाऊन येते, सफरचंद आणायचीयेत,
मलाई दही पण नाहीये, आणि हो, तो गुलाबी रंगाचा कॉटन चा ड्रेस टाकला होता शीवायला.. तो पण घेऊन येते"... तीची धावपळ सुरू झाली... आज खुष होत्या बाईसाहेब...
आज कितीतरी दिवसांनी... आज उद्या आज उद्या म्हणता म्हणता... तिचं सुख तिच्या दारी येणार होतं... "सगळ कसं आवडीचं करायचं.... मागच्या वेळीसारखं व्हायला नको हं"
ती स्वत:ला वारंवार समजवून सांगत होती.
मागची भेट... मागची भेट म्हणताच ती पुन्हा एकदा मागे वळली... पुन्हा तिच्या डोळ्यासमोर सारं उभं राहीलं.. "किती तडतड झाली होती ना मगल्या वेळी,माझ्यासाठी फार त्रास करून घेतला होता... सगळी कामं अर्धवट ठेवून यायला लागलं होतं".. पण ते आवडलं होतं तीला... तीचं महत्व तीच्या लक्षात यायला लागलं होतं
कुणाच्या आयुष्यात इतकं महत्वाचं स्थान? खूप खूप सुखावली होती ती... "माझ्या एका शब्दावर, काही आक्षेप न घेता माझ्या खुळ्या मागण्या पुर्ण केल्या होत्या".. खरं तर इतकं महत्व तिला कुणी दिलच नव्हतं कधी... आणि त्या आधी... ते ही तीला आठवत होतं.. छे.. ते कसं विसरणार ती... तो तर तिच्या जीवनातला सगळ्यात संदर अनुभव..
"ते हलकं पावसाळी उन, कधी एखादी पावसाची सर, कधी अंग शहारून जाणारा वारा... आणि अशा वातावरणात एका गाडीवर... छे.. ".. केवढी लाजली स्वत:लाच... अन पुन्हा स्वत:च डोक्यावर टप्प्ल मारून म्हणाली " हो.. वेडूच आहे मी, तुझी वेडू"... बाजारात जाऊन झालं होतं.. आता घर आवरायला घेतलं तीनी..
"काय हे? किती पसारा, आज लक्षच लागत नाहीये".. बोलता बोलता कॉटवरचे कपडे घडी घातले.. अन चटकन एक रुमाल हातात घेतला... नकळत ओठ टेकले त्यावर, अन गालातल्या गालात स्वत:शीच हसली... "हं... किती वाट पहायची अजून?.. आज तरी नक्की न? की..... " बोलता बोलता पुन्हा कडा ओलावल्या.. मागल्या वेळेला फोन आला होता, "आज नक्की" असं ठरलं होतं, तीनी तशी तयारी ही केली होती.. पण, निघालं काहीतरी काम... राह्य्लं, "चालायचच" होतं असं कधी कधी... तीनी समजून घेतलं होतं, पण न जमण्याची ही पहीलीच वेळ नव्हती, त्याही आधी असं झालं होतं ना? तेव्हाही ठरलच होतं ना... तेव्हाही काही तरी असच झालं... जरा नारज झाली होती ती.. पण ".. ईलाज नाही.. काय करणार... कुणी मुद्दाम नाही टाळत ना... उगाच का कुणी असं करणारे?.. "पुन्हा मनाची समजूत घातली तिनी.. त्याही आधी मात्र अगदी सहज पणे समजून घेतलं होतं तिनी... तशी ती समजुतदार होतीच पण जरा भावुक... खळकन डोळ्यात गंगा यमुना उभ्या राहतात...
" झालं झालं... घर आवरून झालं. स्वयपाक झाला.. सगळी तयारी झाली... आता झकास पैकी एक वॉश घेते, तयार होऊन बसते, वाजलेत किती?
छे आज काही वेळ जात नाही, अजूनही जवळ जवळ दीड तास आहेच?.. मी लवकर कामं केलीत, की हा काटाच मेला पुढे सरकत नाहीये? "... उत्साहाच्या भरात झपाझप हात चालत होते... तसे कामं फार नव्हते.. स्वयपाक, अन आवर सावर.. बस.. उत्साह इतका की अगदी सारं जैयत तयार... नंतर वेळ जायला नको नं! इतक्या दिवसानंतर भेट होणार, मग त्यात कुठे अडचण नको... कशाचीही, कुणाचीही... गरम गरम पाण्यानी आंघोळ करून, आजच आणलेला गुलाबी नवा कोरा
ड्रेस घालून गॅलरीत वाट पाहत बसली होती.... तिच्या येणा-या सुखाची..फोनची बेल वाजली तशी धावतच पुढे आली... "गाडी लवकर आली की काय? तासभर आधीच?... अरे वा" आनंदाला पारावार राहिला नाही तिच्या
"हॅलो.. कुठे आहेस? किती वेळ लागेल अजून?.. " धडाडड प्रश्नाच्या भडीमाराला काहीच उत्तर आलं नाही... शांतता... मिनिटभर मौन पाळावं तशी... तिचा चेहरा पुन्हा बदलला... पण यावेळी तिच्या चे-यावर नाराजी नव्हती, की स्वत:ची समजुत काढण्याची कुठली भावना नव्हती.. एकही शब्द पुढे न बोलता तीनी फोब खाली ठेवला..
तशीच ती पुन्हा गॅलरीत जाऊन बसली... कितीतरी वेळ.. निस्त्ब्ध...
उद्यापासून पुन्हा समोर येणा-या रोजच्याच "रूटीन" ची वाट बघत.....