अर्थाचा विनोदी अनर्थ (भाग १-शेअर, दगड आणि लैंगिक शिक्षण)

(अर्थाचा विनोदी अनर्थ- या नव्या मालिकेत मी वेगवेगळ्या हलक्या फुलक्या प्रसंगातून विविध विषयांवर विडंबन सादर करत आहे-)

गेल्या वर्षीपासून आपल्या भारतात थोड्या थोड्या कारणावरून लोक रस्त्यावर येवून तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ करू लागलेत. या वर्षी त्याचे प्रमाण तर सरासरी रोज एक याप्रमाणे झाले आहे. आज जर अशी स्थिती आहे, तर उद्या काय होईल? आणि प्रसारमध्यमांचे प्रतिनिधी तर लगेच तयारच असतात त्याचे चित्रण करायला आणि विविध 'अर्थपूर्ण प्रश्न' विचारायला! 'कशालाही' आजकाल बातमी बनवले जाते. याकडे मी थोड्या 'विनोदी' नजरेने बघितले आणि माझ्या 'भविष्यकालीन' मनात खालील बातम्या भुंग्यासारख्या 'भुण भुण' करायला लागल्या--- एका बातमीचा संबंध कसाही कुठेही जोडला जातो. आणि आपण ते बघतो.  

नमस्कार! दगडफेक आणि तोडफोड, जाळपोळ या विषयाला वाहिलेल्या आमच्या "विध्वंस माझा-२४ तास--चला विध्वंस करूया! (पाहूया!)" या वहिनीवर आपले स्वागत आहे.

भस्मापूर या तालुक्यात एका गावी कुकराबाई नावाच्या सासूने, कढईबाई नावाच्या एका सुनेस थप्पड मारली. ही खबर ऐकताच सराटाताई या सुनेच्या आईने एका थैलीत पाच किलो दगड भरून आणले आणि घरावर दगडफेक केली.... आमचा बित्तमबाज नावाचा एक प्रतिनिधी तेथे हजर आहे आणि हे चित्रिकरण करतो आहे. त्याला आपण  विचारूया ...

निवेदक:      " बित्तू , काय स्थिती आहे आत तेथे? " (समोरून आवाज नाही. फक्त बित्तू मान हलवतो) " बित्तू, झोपलास काय रे? मी काय विचारते आहे? "

बित्तू: " अं, आत्ता, पाचवा दगड मारून झालाय! तरीही कुकराबाई काही बाहेर येत नाही..मात्र तीची 'शिटी'वाजणं बंद झाल्यासारखी वाटतेय, सराटाबाई आल्याने."

निवेदक: " जरा प्रेक्षकांना नीट समजावून सांगशील? " 

बित्तू: " म्हणजे असं की, याच सराटाताईने यापूर्वीही तलवार घेवून कुकराबाईची शिटी बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी ती चक्क दगड घेवून आलीये. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक दहा अंकांनी घसरलाय."

निवेदक: " मग सरकार यावर काय पावले उचलणार आहे?" 

बित्तू: " सरकार लवकरच सासू-सून हिंसाचारा बाबत एक कायदा करण्याच्या विचारात आहे. येथे जे लोक जमले आहेत, ते आता चाललेत शेअर घ्यायला. पण आज " कमाये तू.. या कमाये ना" आणि " थोडा नमक, थोडी शक्कर" हे दोन महत्त्वाकांक्षी चित्रपट रिलिज होत आहेत. तर लोकांना आता असा प्रश्न पडलाय की, ही दगडफेक बघायची, सिनेमाला जायचं की शेअर विकत घ्यायचे... तर आता मी लोकांनाच विचारतो, की ते काय करणार आहेत..?

माणूस१: " माझ्या मते जोपर्यंत सरकार लैंगिक शिक्षण अनिवार्य करत नाही, तोपर्यंत ही जाळपोळ, दगड फेक ही अशीच चालू राहाणार  आणि शेअर बाजार असाच कोसळत राहाणार. मी तर चाल्लोय आता पिक्चर बघायला"

बित्तू:  " खरे तर, कुकराबाई जी कंपनी चालवते त्या कंपनीचे शेअर आता ५०० रुपयांनी खाली आले आहेत. तुला काय वाटतं? "

माणूस२: " हो! दर वेळेला ही येते, आणि दगड मारते आणि शेअर कोसळतात." 

(आता वेळ झालीये एका ब्रेकची! ब्रेकनंतर पाहूया आणखी बातम्या आणि स्पेशल रिपोर्टस ... पाहात राहा ... पाहातच राहा!)