बळीराजा

महाराष्ट्रातील एक खेडे. पावसाची आतुरतेने सगळेच वाट पाहत होते. पेरणी केली, पाऊसच नाही तर करायचे काय ही चिंता सर्व गावकऱ्यांना होती. पेरलेलं बियाणं वाया गेले तर पैसे आणायचे कुठून? अशावेळी कोणी धाडस दाखवायचे, याचीच प्रतीक्षा बहुतेक सर्वजण करत होते.

न राहवून महिपती पुढे आला व त्याने प्रस्ताव मांडला की जवळच्या कृषीविद्यापीठातून कोणा तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेऊन काही उपाय शोधता येईल. जर प्रयत्न यशस्वी झाला तर त्याचे अनुकरण सर्व गावकरी करणार, असेही ठरले.

तज्ज्ञाने पाहणी केली व सांगितले की तलावातील पाण्याचा सांगितलेल्या पद्धतीने वापर केला तर कदाचित सर्व पिके वाचवली जाऊ शकतात. महिपतीच्या शेतात त्याच्याकडे असलेल्या तीन भांड्यांच्या साहाय्याने हा उपाय अंमलात आणला आणि यशस्वीही झाला. सुदैवाने सर्वांच्या शेताचा आकार सारखाच असल्याने इतर गावकऱ्यांनी तीच तीन भांडी आळीपाळीने वापरून त्यांच्याही शेतात उपायाची अंमलबजावणी केली. गावकऱ्यांनी त्या तज्ज्ञाला व कृषीविद्यापिठाला धन्यवाद दिले.

तर मंडळी, त्या तज्ज्ञाने पुढील उपाय सुचविला होताः

एका शेतात रोज बरोबर ८ लिटर पाणी ठिबक सिंचन पद्धतीने घालावे. ६ लिटरची दोन व ११ लिटरचे एक अशी ती तीन भांडी होती. या तिन्ही भांड्यांवर कोणत्याही प्रकारच्या खुणा नव्हत्या की ज्यामुळे त्यांच्या पूर्ण क्षमतेपेक्षा कमी भरलेल्या पाण्याचे मोजमापन करता येईल. तलावातील पाणी ह्या तीन भांड्यांच्या साहाय्याने घ्यावे व नको असलेले / जास्त पाणी पुन्हा तलावात टाकावे.

प्रश्नः

१. बरोबर ८ लिटर पाणी शेतीसाठी कसे घेता येईल?

२. कमीतकमी किती पाणी (नको असलेले / जास्त) तलावात परत टाकावे लागेल?

मग काय मनोगतींनो, तयार आहात ना ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे द्यायला!