२५ जुलै !

मध्यान्हीचा काळ होता. दुपारी १. ३० वाजता अंधेरीला एका कामासाठी गेलो होतो तेथून सरळ ठाण्याला जायचे होते. अंधेरीचे काम आटोपले व त्या जागेमधून बाहेर रस्त्यावर येताच एक विचित्र जाणीव झाली. सगळीकडे एक गूढ अंधार पसरलेला होता. भर दुपारी असा काळोख बघून जरा आश्चर्य वाटले. पण मुंबईत पावसाळ्याच्या दिवसांत हे नित्यनेमाचे असते असा विचार करून स्कूटर दामटवली. पश्चिम द्रुतगती मार्गावरून सीप्झ व पुढे पवई आय. आय. टी. मार्गे ठाणे असा प्रवास करायचा होता व रस्त्यात कुठेतरी पाऊस लागणारच हे ताडून "रेनकोट" चढवला.
जेमतेम लाल बहादूर शास्त्री मार्गावरून कांजूरमार्ग ला पोहचत नाही तोवर जोरदार वृष्टी सुरू झाली.....
जवळच तर जायचंय असा विचार करून प्रवास हळू हळू सुरू ठेवला..... नंतर कळले तेच शहाणपणाचे होते. मी पुढे सरकत होतो व मागचे रस्ते तुडुंब भरले जात होते. मुलुंड ला जवळजवळ गच्च भिजलेल्या अवस्थेत पोहचलो व आता आलोच आहे तर काम संपवून जायचेच हा विचार केला.
काम अर्धवट होत असतानाच सौ. चा भ्रमणध्वनी वर संदेश आला 'घरी फोन कर'. मी कामात किंवा स्कूटर हाकत असतो म्हणून लघुसंदेश पाठवून ती नेहमी व्यत्यय न आणण्याचा प्रयत्न करीत असते. घरी फोन केला व कळले की आमच्या भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. जेमतेम ४ पर्यंत काम संपवून घरचा मार्ग धरला.

कुठले काय मुलुंड कॉलोनी पर्यंत पोहचलो व बघतो तर दुचाकी वाले इशारा करत मागे फिरायला सांगत होते. थोडं पुढे गेल्यावर कळले की भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग सगळेच रस्ते बंद पडले होते. एकच पर्याय होता. घोडबंदर रोड..... भर पावसात जेमतेम ३० च्या वेगाने घोडबंदरच्या रस्त्यावरून मिरारोड गाठले तर हायवे जाम!
कधीतरी चुकून माकून घरी फोन लागल्यास ख्याली खुशाली कळवत होतो.
कसातरी कमी पाण्यातले रस्ते हुडकत घरी पोहचलो तेव्हा संध्याकाळचे सव्वा सात वाजले होते. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर बायकांचा लोंढा उभा होता. कोणाची मुले शाळेत अडकून पडली होती तर कुणी नवरोबाच्या काळजीत होत्या.
इमारतीत प्रवेश केल्यावर कळले - वीज गायब झालेली आहे..... अर्थात इतका गोंधळ उडाल्यावर विजेचे बारा न वाजले तरच नवल होतं...... घरी पोहचताच कळले दोघी मुली शाळेत अडकलेल्या होत्या. नशीब सौ चे शाळेत फोन वर बोलणे झाले होते व शाळेने मुलांना जोवर जबाबदार व्यक्ती शाळेत येऊन घेऊन जात नाही तोवर घरी पाठवणार नाही असा योग्य पवित्रा घेतला होता.
घाई-घाईत कपभर चहा ढोसला व तडक मुलींना आणावयास निघालो..... शाळेच्या रस्त्यांना चहूबाजूंनी नदीचे रूप आलेले होते. त्यातल्या त्यात रस्त्यांचा उतार-चढाचा अंदाज घेत शाळेच्या इमारतीत शिरलो..... एरवी कलकलाटाने शाळा डोक्यावर घेणारी चिल्लीपिल्ली चिडीचूप बसलेली बघून काळजात कालवाकालव झाली. आधी मोठीला शोधू म्हणजे धाकटी आपोआप सापडेल ह्या विचाराने प्रांजलीला शोधले.... दोघी एकाच वर्गात भेदरून बसलेल्या होत्या..... मला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्वस्ततेचे भाव अजूनही डोळ्यांसमोर आहेत. त्यांना थोडा धीर देऊन मी मुख्याध्यापिकेकडे गेलो..... इतक्या गोंधळाच्या वातावरणातही शक्यतो शांतपणाचा कौतुकास्पद पवित्रा त्या बाईने घेतला होता. आमची तोंडओळख होतीच मी तिला मुलींना घरी घेऊन जाण्याबाबतची प्रक्रिया काय त्याची चौकशी केली. सर्व सोपस्कार पार पाडत आम्ही कंबरेइतक्या पाण्यातून ज्या उंच भागावर स्कूटर ठेवली होती तेथे पोहचलो.

"भूक लागली आहे का? " सुखरूप जागी पोहचताच मी त्यांना विचारले......
"नाही शाळेत सगळ्यांना बिस्किटे वाटली"....
प्रसंगावधान राखून शाळेने आसपासच्या दुकानांतून बिस्किटाचे पुडे घेऊन ठेवल्याचे नंतर कळले.

घरी पोहचताच लढाईवरून विजयी होऊन परतल्यावर जसा जल्लोष होतो तसा सोसायटीच्या दारात झाला. जो कोणी बाहेरून येत होता त्याला आसपासच्या भागातली हालत सगळ्यांना चार चार वेळा (मीठ मसाला लावून) सांगावी लागे.

नशिबाने ८० % माणसे रात्री १२. ३० पर्यंत सुखरूप पोहचली होती.........
जी अडकली होती ती दोन दिवसांनंतर घरी पोहचली!

कित्येक संसार उध्वस्त झाले होते.......  
पुरात वाहून गेलेल्या पतीचे शवही हाती न आल्याने रडणारी त्याची पत्नी......
पाण्याच्या दाबाने मोटारीचे दार उघडले गेले नाही म्हणून आतच प्राण सोडावा लागणारी माणसे.....
टीव्ही-वॉशिंग मशीन- संगणका सह घरातले सर्व सामान धुऊन निघाल्याने डोक्याला हात लावून बसलेली मध्यम वर्गीय माणसे......
तीन वर्षे उलटली पण त्या दिवशी पावसाने माजवलेला कहर आजही आठवतो. जखमा भरल्या असतील पण व्रण कायम आहेत.

आज २४ जुलै २००८ - जोगेश्वरीला सावंत हॉस्पिटलला पोहचेपर्यंत पावसाचा टिपूस नव्हता; बाहेर येऊन बघतो तर धो धो पाऊस कोसळतोय..... स्कूटर पर्यंत जाऊन आतला रेनकोट काढे पर्यंत भिजणार म्हणून एका बाजूच्या आडोशाला उभा होतो तेव्हढ्यात त्या रुग्णालयात काम करणारी मावशी बाहेर आली;
"काय छत्री नाही आणलीत की काय? " त्यांनी हसत विचारले.
"नाही रेनकोट आहे पण स्कूटर मध्ये ठेवलाय, घेऊन येईपर्यंत भिजेन म्हणून थांबलोय. जरा उघडीप झाली की पटकन चढवून निघणारच होतो. " मी
"कसला थांबतोय तो.... तीन वर्षापूर्वी असाच कोसळला अन माझ्या घराची वाट लावली त्याने. तुम्ही ही छत्री घ्या व रेनकोट काढून आणा हवे तर" मावशी बोलल्या.
पटकन मी रेनकोट काढून आणला. छत्री परत केली व पुढच्या कार्यक्रमाकडे वळलो......
चार पर्यंत उसंत न घेता पाऊस कोसळतच होता. रस्त्यात कुठे तळी साचली होती तर कुठे रहदारीचे बारा वाजले होते. कसेतरी एक महत्त्वाचे काम आटपून घरचा रस्ता धरला.... घरी पोहचेपर्यंत चिंब भिजलो होतो-
जेवण झाल्या झाल्या संगणका कडे मोर्चा वळवला. विपत्रांवरची तारीख बघितली व अचानक त्या दिवसाची आठवण झाली.
बाहेर पाऊस कोसळतोय - अगदी २५ जुलै २००५ ची आठवण करून देणारा -  
आणि मी संगणकावर मनोगतासाठी एक लेख लिहितोय.... कारण जगभरातल्या मनोगतींनी( दुवा क्र. १ ) त्या दिवशी आम्हा मुंबईकर मनोगतींची काळजी केली होती.