आपलं तर बुवा असं आहे!

आपलं तर बुवा असं आहे, तुमचं माहित नाही कसं आहे
ऑफिसात साहेब असलो तरी घरी मात्र हीच बॉस आहे
आपलं तर बुवा असं आहे, तुमचं माहित नाही कसं आहे
हिच्या खात्यात नेहेमीच प्रॉफीट, आमच्या खात्यात कायमच लॉस आहे
आपलं तर बुवा असं आहे, तुमचं माहित नाही कसं आहे
ही गोल गरगरीत वर्तुळ, मी मात्र वर्तुळाचा व्यास आहे
आपलं तर बुवा असं आहे, तुमचं माहित नाही कसं आहे
मी आपला साधा भोळा विश्वामित्र, ही ऋषी दुर्वास आहे
आपलं तर बुवा असं आहे, तुमचं माहित नाही कसं आहे
माझी आपली मेष रास, हिची सिंह रास आहे
आपलं तर बुवा असं आहे, तुमचं माहित नाही कसं आहे
आमच्या कपड्यांना घामट वास, हिच्या साडीला अत्तराचा सुवास आहे
आपलं तर बुवा असं आहे, तुमचं माहित नाही कसं आहे
माझा मित्र उपटसुंभ, पण हिची मैत्रीण खास आहे
आपलं तर बुवा असं आहे ....
काय म्हणता? तुमचंही माझ्यासारखंच सेम टू सेम आहे?
अहो मग आधी नाही का सांगायचं!
ती कशीही असली (कशीही दिसली) तरी, तुमचं तिच्यावर माझ्यासारखंच ....
(आय मीन, माझं जसं माझ्या हिच्यावर आहे तसंच) प्रेम आहे!  प्रेम आहे!! प्रेम आहे !!!

-- प्रशांत बाळापूरे (फैजपूर, जि.जळगांव)