दूरचे दिवे

दोन खोल्या एकमेकींना इंग्रजी "एस" आकाराच्या वळणाच्या सहा फूट उंच नि रुंद काँक्रीटच्या दोनशे मीटर लांब बोगद्याने जोडल्या आहेत. बोगदा अंधारा आहे आणि त्यात जागोजागी वाटेत आडवे येतील असे काळे कभिन्न जाड पडदे लावलेले आहेत. ते बाजूला सारत सारतच प्रवास करावा लागतो. थोडक्यात, खोली क्रमांक एकमधून खोली क्रमांक दोन अजिबात दिसत नाही.

पहिल्या खोलीत लाकडाच्या एका बोर्डावर दिव्यांची तीन बटणे आहेत (घराघरात असतात तशी, पांढरी आयताकृती प्लास्टिक वा तत्सम पदार्थाची). प्रत्येक बटणाला वेगवेगळा क्रमांक दिलेला आहे - १, २ आणि ३. तिन्ही बटणे सध्या 'बंद' या अवस्थेत आहेत. पण ती (कितीही वेळा) 'चालू' वा 'बंद' करण्याची तुम्हांला मुभा आहे. 

दुसऱ्या खोलीत ६०W क्षमतेचे तीन दिवे आहेत. त्या दिव्यांना नावे आहेत क, ख आणि ग.

पहिल्या खोलीतल्या एका (आणि एकाच) बटणाने दुसऱ्या खोलीतल्या एका (आणि एकाच) दिव्याचे नियंत्रण (चालू-बंद) होते.

दोन्ही खोल्यांतले तापमान थंडही नाही आणि गरमही नाही असे, साधारण २६ अंश (सेंटिग्रेड) च्या आसपास आहे.

तुम्ही पहिल्या खोलीत आहात. तुम्हांला अर्ध्या तासाच्या आत दुसऱ्या खोलीत जायचे आहे. आणि कुठल्या क्रमांकाचे बटण कुठल्या अक्षराच्या दिव्याला नियंत्रित करते ते तिथेच (दुसऱ्या खोलीत) सांगायचे आहे. पहिल्या खोलीत परत यायला परवानगी नाही. किंबहुना त्या बोगद्यातून एकदाच आणि एकाच दिशेने (खोली क्रमांक एक ते खोली क्रमांक दोन) जायला परवानगी आहे.

हे कसे जमवाल?