ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत! आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार, आमचा एक प्रतिनिधी मांजरीच्या हल्ल्यात जखमी झालेला आहे. त्याचे कव्हरेज करायला गेली आहे आमची एक प्रतिनिधी कुमारी 'अखंडा बडबडकर'
न्यूजरूमः " अखंडा, कसे काय झाले हे सगळे? "
अखंडाः " त्याचे असे झाले की, ही जी मांजर आहे ती कुकराबाईच्या स्वयंपाकघरात उंदराला शोधीत होती. तेवढ्यात कुकराबाईने मांजरीला हाकलले. कारण ती (कुकराबाई) अगोदरच संतापलेली होती, व कुकरची शिटी सराटाबाईला मारण्याच्याच तयारीत होती. तेवढ्यात उंदीर खिडकी बाहेर पळाला आणि त्यापाठोपाठ मांजरही! आणि सराटाबाईला मारलेली कुकरची शिटी सराटाताईने सराट्याने परतवून लावली. तेवढ्यात आमचा प्रतिनिधी खिडकीत चढून आत कुकराबाईची मुलाखत घेण्यास निघाला होता, तेव्हा त्याने ऐकले की कुकराबाईने सुनेला एका खोलीत बंद केले होते आणि ती दार उघडा असे ओरडत होती..तेवढ्यात त्या मांजरीला ती शीटी लागली आणि तीने जोरात "म्यांव" करत खिडकीबाहेरच्या आपला प्रतिनिधी बित्तूच्या तोंडावर उडी घेतली आणि बित्तू जमिनीवर आपटला! "
न्यूजरूमः "अरेरे, फारच वाईट झाले"
अखंडाः "बित्तू आता हॉस्पीटलमध्ये आहे"
न्यूजरूमः "बरं अखंडा, ह्या मांजरीबद्दल तू अधिक माहिती सांगू शकशील?कोठून आली ही मांजर? तीचे घर? तीचा पत्ता?"
अखंडाः "मांजरीचा तपास मी करणारच आहे. पण त्या उंदराबद्दल माहिती मिळाली आहे. हा उंदीर फार चालाख असून या मांजरीच्या हाती कधीच लागत नाही. तो एक किलोमीटरवर असलेल्या एका गोदामात राहातो अशी माहिती येथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितली आहे."
न्यूजरूम: "अखंडा, ब्रेकनंतर आपण बोलूच. तर दर्शकहो, आपण अखंडाशी बोलतच राहू... पण त्या आधी वेळ झालिये एका ब्रेकची.. पाहत राहा, पाहतच राहा, विध्वंस माझा!"