डोळे बंद, ओठ बंद,
समोर फक्त बंद मूठ
मुठीत केस पापणीचा...
इच्छापूर्ती?? साफ झूठ ॥
बंद मूठ उठत नाही,
म्हणून प्रश्न सुटत नाही
'प्रकाश हवाय प्रकाश' म्हणताना,
काजळी मात्र हटत नाही ॥
प्रश्न सगळेच पोरके असतात,
आपणच त्यांना आपलं म्हणतो
नकोच असतात उत्तरं ज्यांची
त्यांनाच खूप 'जपलं' म्हणतो ॥
पण का आणि खरंच कुठवर-
वहीत मोरपीस उगाच खोलवर?
मोर व्हायला जमलंय का?
नाचलोय कधी आभाळभर? -
- हेच प्रश्न आपले आहेत.
पापणीच्या केसांत उत्तरनक्षी?
मग उघडा मूठ, मारा फुंकर
येतोय का पाहा मोर वक्षी?
'मोरपंखीच आहेत पापण्या' म्हणता?
तर मग पिसाऱ्यासारखंच उघडा त्यांना
पाहा आपल्याच पिसाऱ्याच्या दोन्ही बाजू
बघाच थरथरताना त्यांना ॥
.
.
.
मेघ दाटलेत, येणार पाऊस
मोर व्हा, फुलवा पिसारा
पापणीच्या केसांत नाहीत उत्तरं
आवरून ठेवा त्यांचा पसारा ॥