संध्या

कुणी विराट पश्चिमेवरती
बघ रक्त सांडले आहे
अन समुद्र लंघण्यासाठी
का संगर मांडले आहे

हि लयीत होती आता
झाडांची कोवळी पाने
अंधार सावरतांना
झुलणारी हिरवी राने

का नि:शब्द येथली झाडे
अन नि:शब्द आतला प्राण
हे पटावर विखुरलेले
शकुनीचे कपटी दान

अनंत पोकळीमधुनी
येती अज्ञाताची गाणी
संध्येच्या उंबरठयावरती
कुजबुजणारी कातर वाणी

मी मर्त्य असुनी येथे
अमर्त्याचे जगणे जगतो
तळहाताच्या रेषांवरती
वाळूची नक्षी बघतो
-देवदत्त