चतुराई

ch5a

चतुर. एक साधा किटक. पण थेट काही दशके मागे नेणारा. शाळेतले दिवस आठवायला लावणारा. फुलपाखरे, टाचण्या आणि चतुर हे विशेष कुतुहलाचे विषय. काही मुले फुलपाखरे पकडायची व बाटलीत ठेवायची. मग ती मेल्यावर पंख पुस्तकात घालायचे! हा प्रकार मला कधीच आवडला नाही. त्या काळी प्रकाशचित्रणाचा नाद नव्हता आणि अक्कलही नव्हती (अजुनही नाहिये म्हणा; पण हातात क्यामेरा तर आहे? )

मला चतुर आणि टाचण्या अधिक आवडायच्या. चतुर बरे. दबकत जाऊन पकडायचे आणि शेपटाला बारीक घागा बांधून पतंगासारखे उडू द्यायचे. मग थोडा वेळ मस्ती झाली की धागा तोडून टाकायचा आणि सोडून द्यायचे. टाचण्या मात्र फार नाजुक. त्या पकडल्या तरी अगदी अल्गद सांभाळाव्या लागायच्या, उगाच आपल्या हातून काही व्हायला नको. शेपटीला धागा बांधायला जायचो आणि शेपुट तुटायची.

ch6a चतुराच्या जवळ जवळ पारदर्शक असलेल्या पंखावरची जाळी खासच! संगमरवरावर वा दगडात मस्त जाळी कोरून काढावी तशी ही जाळी. मध्यंतरी एकदा बाहेरगावी गेलो होतो. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या एका पर्यटनगृहात मुक्कम होता. कधी नव्हे ते दुपारी न झोपता जरा भटकायला निघालो. कुटी च्या बाहेर आलो आणि एका वाळकटलेल्या रोपट्यावरच्या चतुराकडे लक्ष गेले. बरोबर कॅमेरा होताच. तात्काळ सरसावला आणि त्याची छबी टिपली.
ch4a डांग्या चतुर त्या मानाने जरा मोठा. आणि त्याच्या पंखांचा आवाजही अधिक फरफराटी. पकडायला भीती वाटायची. लालभडक शेपुट पाहून या नांगीत विष असेल का? आणि नांगी मारली तर काय होईल ही धास्ती वाटायची. मग काही टगी मुले आपण पकडलेला डांग्या चतुर घेउन मोठ्या रुबाबात फिरायची. आत्ता फिरतानाही असाच एक डांग्या चतुर दिसला. गडद गुलाबी अंग, प्रत्येक जोडाला गुलाबी रंगाच्या कडेला लालभडक रंगाच्या रेषा. पंखांवर काळ्या भागावर मात करणारी लालगडद पण नाजुक जाळी. स्वारी पंख मुडपून एवढ्या एकाग्रतेने त्या वाळलेल्या शुष्क फुलात काय पाहत होती कोण जाणे.
ch3a मध्येच विचलीत होत तो चतुर उडाला आणि काही वेळ भिरभिर करून व माझी थोडी दमछाक करून पुन्हा जवळच्याच एका फुलावर येऊन बसला. स्वारी जरा आरामत बसलेली दिसली तरी पंख आखडलेलेच होते. कदाचित बसायचे की नाही हे ठरत नसावे.
ch2a

अलगद पाय न वाजवता त्याची तंद्री भंग न करता मी वळसा घेत दुसऱ्या अंगाने गेलो. आता या कोनातून त्याचे डोके पंखातून आरपार दिसत होते. जणू डोक्यावर जाळिदार ओढणी घेतलेली एखादी रमणी. त्या परिसरात चतुर बरेच असावेत. थोडे पुढे गेलो असता अचानक एका झुडुपावर एक काळे ठिपके असलेल्या सोनेरी पंखांचा चतुर दिसला आणि मी नकळत तिकडे सरकलो. बराच वेळ पाठ शिवणीचा खेळ खेळून झाल्यावर हे महाशय एका दूरच्या खुरट्या झुडुपावर स्थिरावले. वाटेत एक डबके, आजुबाजुला काटेरी झाडे. अखेर होतो तिथुनच मध्ये येणाऱ्या फांद्या व पाने चुकवून त्याचे पंख टिपले. जमले तसे.

ch1a

पलिकडून हाक आली. बाहेर जायचे होते. कॅमेरा म्यान केला नि निघालो.