आठवण

घन दाटता अंबरी, सर येई आठवांची
उठे लहर अंतरी, चिंब ओल्या जाणिवांची
आत कप्प्यात तळाशी
पाय दुमडून उराशी
घेणे देणे ना कुणाशी
बोल बोलुनी स्वतःशी
सुप्त आठवणी, पडल्या निपचित
उचंबळुनी, येती अवचित
जैसी मृगाचिया धारा
भेगाळलेल्या या धरा
साद देऊन मल्हारा
बीज अंकुरे उदरा
तैसी साठवण, खोल गाभारी
डोकावे आडून, घेइ उभारी
एक एक आठवण
तिच्या पायात पैंजण
असे गुंफीते रिंगण
त्यास आभाळ अंगण
मन पाखरू, सवे बागडते
पुन्हा नव्याने, मज उमगते