मच्छरदाणी : एक वरदान

मच्छरदाणीःएक वरदान

स्वतःच दिलेलं शीर्षक वाचून शाळेतल्या निबंधांची आठवण झाली. शाळेत 'दूरदर्शनः शाप की वरदान' असा विषयअसे. असले विषय आले की अंगावर येणारा काटा अजून आठवतो. अमुक की तमुक असं काही समोर आलं की मलाशिक्षकरूपी वेताळ खांद्यावर बसून 'सांग, हे की ते? एकही बाजू घ्यायला असमर्थ ठरलास तर तुझ्या उत्तरपत्रिकेची शंभर शकलंहोईपर्यंत मी ती फाडण्याचा कार्यक्रम सुरू ठेवीन... ' असं काहीतरी म्हणत असल्याचं दृश्य दिसतं.

कुठली तरी एक बाजू घेऊन त्यावर विचार करायला लागलं की मला दुसरीच बाजू दिसू लागते बराच वेळ विचारकेल्यानंतर मी 'शाप की वरदान, वाचकांनीच ठरवायचं' असं म्हणून मोकळा होत असे. उगाच आपल्या अंगावर कशालाघ्या?

मच्छरदाणीच्या संदर्भात मात्र माझी मनःस्थिती द्विधा कधीच नव्हती. ती मानवजातीसाठी एक वरदानच आहे, अशीमाझी धारणा आहे. धारणा बरेचदा अनुभवसिद्धच असते. वरदान कशी, हे कळण्यासाठी लेख संपूर्ण वाचावा.

ज्याने मच्छरदाणीचा शोध लावला तो अचानक माझ्यासमोर आला तर त्याला मी मच्छरदाणीत असलो तर साधाआणि नसलो तर साष्टांग नमस्कार घालीन. आपण दुनियेत कोणत्याही ठिकाणी असलो(अक्षरशः कोणत्याही ठिकाणी)तरीडास आपला पिच्छा पुरवतात. वाघापासून दूर पळता येईल, चोराशी लढाई करता येईल, भुताला रामनाम जपून परत पाठवतायेईल एवढंच काय पण डायनोसोरपासूनही स्वतःला वाचवता येईल पण डासाशी सेकंदभरही दोन हात करता येत नाहीत. कसेकरणार? ते व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. एखाद्या विचित्र कोप-यात एक वेळ डायनोसोरची सोंड पोचणार नाही पणतिथे डासाची सोंडच नाही तर संपूर्ण धूड सहज पोचतं. स्वतःची शिकार इथे आहे, हे त्याला कसं समजतं? झोपण्याआधीमाणसं गुणगुणत असती तर त्या आवाजानं डासाला समजतं, असं मानलं असतं. गुणगुणतात ते डास, माणसं नव्हेत. अंधारात मांजराला आणि घुबडाला दिसतं, असं शाळेत शिकवलं जातं. या माहितीचा पुढच्या जीवनात काय उपयोग असतो? डासाला अंधारात दिसतं, असं शिकवलं गेलं पाहिजे. तसं झालं तर मच्छरदाणी खरेदीची मानसिकता शाळेत असल्यापासूनच तयार होईल.

मलम लावणे, अगरबत्ती लावणे अथवा धूप जाळणे, खिडक्यांना जाळ्या बसवून घेणे, निर्वंश करणे(डासांचा) आणि मच्छरदाणी लावणे या उपायांपैकी शेवटचा उपाय सर्वोत्तम आहे.

मलमाच्या विषारी वासामुळे डास शरीराजवळ वास करीत नाहीत, हे खरं आहे पण मुळात मलम संपूर्ण शरीरावर लावणं शक्य आहे का? जी जागा रिकामी तिथे डासांचा हल्ला. मलमाचा विषारी लेप काढायला दुस-या दिवशी साबणाच्या वडीचाभुर्दंड. ब-याच तरूणी ब्यूटी क्रीम लावावं, तसं ते लावतात. डासांनी चेह-याजवळ घोटाळावं म्हणून नाही तर चेह-यालाटाळावं म्हणून या मलमाचं प्रयोजन आहे, हे भान त्यांना देण्याची गरज आहे. अपार्टमेंटमध्ये राहणा-यांची पोटं टाकीतलंपाणी पिऊन पिऊन जशी तयार झालेली असतात, त्याप्रमाणे मलम चाखून चाखून डासांची पोटं नक्की तयार झालेलीअसणार, असा माझा गाढ विश्वास आहे.

अगरबत्तीचा उपाय म्हणजे स्वतःची शुद्ध फसवणूक आहे. अगरबत्तीमुळे काळं तोंड घेऊन डास आपापल्या घरीपरतण्याऐवजी तिच्या धुरामुळे ती लावणा-यांचीच तोंडं सकाळी काळी झालेली आढळतात. (बाकी डास आणि चांभार राहतातकुठे, याची मला लहानपणापासून उत्सुकता आहे) अगरबत्ती रात्रभर जळेल याची खात्री, निर्मातादेखील देऊ शकत नाही. अगरबत्ती दिलं वचन पाळत नाही. सहसा रात्रभर ती जळत नाही. निद्राराणीच्या साम्राज्यात आपली साथ अर्ध्या रस्त्यातसोडून ती मान टाकते. तिनं आधी सोडलेल्या धुराच्या पुण्याईवर आपण जगतो- म्हणजे झोपतो. शिवाय, सकाळी उठल्यावरती घडलेल्या घटनेची सगळी राखही साफ करावी लागते.

डास धुपालाही कितपत धूप घालतात, याची मला शंका आहे. तो लावल्यामुळे काही काळ डास दूर जातात, हे खरंअसेलही पण समोरचा माणूस दिसेनासा होतो. एक दिवस धुपाचा वास त्यांना आवडेल आणि डास नेमक्या त्याच वेळी गर्दीकरतील, असे भाकीत मी करू इच्छितो. (धूर असतानाच घ्यावं चावून. म्हणजे माणसांना आपण दिसणारच नाही' असाविचार एकाही डासाला सुचू नये? कमाल आहे. )

दरवाज्याला आणि खिडक्यांना जाळ्या लावणं, या उपायात दारं उघडीच ठेवावी लागतात. कधीकाळी गावाला जायची वेळआली की, जाळी काढून दारं बंद करायची. किती कष्ट! दारं कायमस्वरूपी बंद केली की आपल्यावरच गुदमरून मरायची पाळीयेते. शिवाय, मला नेहमी असं वाटतं की, जाळीच्या बारीक चौकोनाहूनही बारीक शरीर करून डास केव्हातरी आत घुसतीलच. सैनिक जसे कोपरावर रांगत रांगत पुढे सरकतात तसे. एकुणात, जाळी लावूनही मनःशांती नाही.

हिंसेचं पातक माथ्यावर घ्यायची तयारी असेल तर मारण्याचा उपाय चांगला. पण हे चिकाटीचं काम आहे. शिवाय, हेकाम साईड बाय साईडही करता येत नाही. पूर्ण वेळ करण्याचं काम आहे. नुसती तयारी दाखवून चालत नाही. डोळ्यात तेलघालून दबा धरून बसावं लागतं. जवळ आला रे आला की, मारायचा फटका. हा फटका बरेचदा स्वतःला लागतो त्यामुळेक्लेशही होतात. सीरीयलमध्ये जेवढ्या पटापट माणसं मरतात, तेवढ्या पटापट डास नक्की मरत नाहीत. तळहातावरमारलेल्या डासाच्या रक्तामुळे 'रंगे हाथ' म्हणजे काय ते पाहता येतं. या सगळ्या भानगडीत वेळ खूप जातो. दमणूकही होते.

मच्छरदाणी हा सर्वोत्तम उपाय आहे.

मच्छरदाणी लावताना पाणी, वृत्तपत्र, उशी पांघरूण आणि आपल्याला आत लागणा-या इतर गोष्टी आधीच घेऊनठेवायच्या. या गोष्टी आपल्याबरोबर मच्छरदाणीत कोण असणार आहे आणि आपण मच्छरदाणीत काय करणार आहोत, यावर अवलंबून आहेत. आतापर्यंतचा माझा अनुभव तरी चांगला आहे. (म्हणजे मच्छरदाणी लावण्याचा. )मच्छरदाणी लावल्यावर डास आत येत नाहीत.

चावणं तर दूरच, ते स्वतःच आपल्यापासून खूप दूर राहतात. मलम, अगरबत्ती, धूप या गोष्टी संपल्या की परत परत आणाव्या लागतात. जाळी वर्षानंतर बदलावी लागते. मच्छरदाणीकमीतकमी एक पिढी टिकते. मच्छरदाणीमुळे विषारीपणाचा त्रास नाही, तोंडंही काळी होत नाहीत, धुराचाही त्रास नाही. आळशीपणा कमी करण्यातही मच्छरदाणी हातभार लावते. जितका वेळ झोपू तितका वेळ खात्रीशीर सेवा मिळते. झोपलेलो असताना मच्छरदाणी दुस-याने चोरली, अशी घटना अजून तरी घडलेली नाही. सुरुवातीला थोडे कष्ट पडतात, मग सुखच सुख. डास न चावण्याची शंभर टक्के खात्री या माध्यमातून मिळते. एकदा लावलीकी, डास बाहेर आणि पण आत. या अवस्थेत एक दक्षता घ्यावी लागते. अंदरसे कोई बाहर न जाने पाये वरना मौकेका फायदा उठाकर मच्छर अंदर घुस सकते है.

(टीप : या लेखाचे वाचक मला चावू लागण्याच्या आधीच नमूद करतो की मी कोणत्याही मच्छरदाणीच्या उत्पादकाचाएजंट नाही. )

-केदार पाटणकर