आधी लिहीलेल्या "प्रश्न?" वर हे उत्तर.
काहीतरी करत राहणं महत्त्वाचं. मोकळ्या वेळी पहिल्यांदा मनात जे येईल ते सुरू करावं. नंतर कदाचित मन पलटी मारेल आणि काहीतरी वेगळं करावंस वाटेल. पण मग लगेच ते नवीन काहीतरी करणं उत्तमच. म्हणजे किचन साफ करताना काही वाचावंसं वाटलं किंवा मेल चेक करता करता झोपावं वाटलं किंवा अभ्यास करता करता काही लिहावंसं वाटलं. या सर्व वेळी हातातलं सोडून नवीन करणं म्हणजे त्या क्षणाला पूर्णपणे न्याय देणं. वर्तमानात जगणं. भारंभार पुस्तक वाचून किंवा चित्रपट बघून, लिखाणासाठी काही सुचलंच पाहिजे हे चुकीचंच. आणि त्याचा वेगळं काहीतरी घडण्याशी संबंध अजिबात नाही. वर्षानुवर्ष एकच काम करत राहणाऱ्या काही व्यक्तींकडूनसुद्धा साहित्यनिर्मिती झाली असेलच. म्हटलं तर वेगळं असं कधीच काही घडत नसतं. म्हटलं तर प्रत्येक क्षण नित्यनूतन आहे. बऱ्याच वेळेस काहीच वेगळं न वाटणं हिसुद्धा एक संवेदनाच. आपल्या वाढलेल्या अनुभवातून, त्यातून घेतलेल्या धड्यातून तयार झालेली. वेगळं म्हणजे कदाचित आपल्या पंचेंद्रियांच्या वेगवेगळ्या अनुभवातून तयार होऊ शकणाऱ्या असंख्य कॊंबिनेशनमधलं, मेंदूमध्ये न साठवलेलं एक कॊंबिनेशन. मेंदू कदाचित अतिशहाणपणाने त्या कॊंबिनेशनला वेगळं ठरवत नसेलही. पण ते कॊंबिनेशन तो मेंदू साठवणार हे नक्की आणि परत कधी त्याला उपरती झालीच तर "त्यावेळी आपण वेगळं काहीतरी अनुभवलं" अशी आठवण नक्की करून देणार. लिहिण्याची अथवा निर्मितीची प्रतिभाषक्ती कुठूनही येवो, देवाच्या प्रसादातून किंवा आपल्या प्रयत्नातून, आपण फक्त तिला शरण जाऊन आपलं निर्मितीचं काम करत राहायचं. चांगलं, वाईट कुणी काहीही म्हणो, कुणी छापो न छापो अथवा विको न विको आपण फक्त आपल्याला आनंद देईल ते काम करत राहावं. मग यात त्या प्रसाद वाटणाऱ्या देवाच्या किंवा निसर्गाच्या अस्तित्वाचा मुद्दा कुणी कसाही मांडला तरी फरक काय पडतो.
प्रश्न काय पडत राहणार. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना आणखी एखादा प्रश्न पडणं हे कदाचित त्या प्रश्नाला साजेसं उत्तरचं. शैक्षणिक पात्रता किंवा नोकरी किंवा पगार याचा बुद्धीशी संबंध असेल कदाचित पण बुद्धीचा संबंध पडणाऱ्या प्रश्नांच्या संख्येशी नक्कीच नसावा. असला तरी मग असं म्हणावं लागेल की बाकीचे दुर्दैवी आहेत की त्यांना आपल्याएवढे प्रश्न पडत नाहीत. या प्रश्न पडण्याचा एकटेपणाशी संबंध नसावाच बहुतेक. कारण संसारात रमलेल्या, एखाद्या गोष्टीत गुंतलेल्या लोकांना कुठलेच प्रश्न पडत नाहीत असे अशक्य आहे. त्यांचे प्रश्न निराळे असतील. आता एकटेपणा हा बहुतेक मनातल्या तुटलेपणाच्या अवस्थेशी जोडलेला आहे. आपण जितके स्वत:ला इतरांपासून वेगळे समजू, निसर्गापासून वेगळे समजू, जितकी आपली दु:ख आपल्याला वेगळी वाटतील, जितकी ती आपण स्वत:जवळ ठेवू आणि त्यांच्या चक्रव्यूहात अभिमन्यूसारखं अडकण्यात आणि दु:खरुपी कौरवांकडून संहारीत होण्यात धन्यता मानू, तेवढी आपली एकटेपणाची भावना अधिक. व्यक्तिस्वातंत्र्याच्या, स्वतंत्र विचारांच्या या कल्पनांचा आधुनिक, अवास्तव आविष्कारसुद्धा कारणीभूत आहे या एकटेपणाच्या भावनेला. व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य उपभोगण्याच्या नावाखाली आणि विचारांच स्वातंत्र्य जपण्याच्या नावाखाली आपण आपल्याच माणसांपासून, निसर्गापासून तोडले गेलो तर एकटं वाटण अपरिहार्यच. शिवाय एकटेपणा संपवण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीत, छंदात स्वत:ला यंत्रवतपणे गुंतवून घेतल्यामुळं हा एकटेपणा संपणार नाही हे नक्की. त्यासाठी कुठंतरी मनाच्या तारा जोडता आल्या पाहिजेत. मग भले ती गोष्ट निर्जीव असेल. निर्जीव विषयांवरच्या संशोधनात आयुष्य कारणी लावणाऱ्या संशोधकांची उदाहरणं काही कमी नाहीत. खूप विचारांनी येत असेल एकटेपणा, पण विचार योग्य दिशेनं प्रवाही ठेवले तर बहुतेक खूप विचार खूप लाभदायकच ठरतील. मग विचारांचं मोजमाप गौणंच ठरतं. फक्त तुटलेपण टाळता आलं पाहिजे. शेवटी काय, खूप पूर्वी आपल्या पूर्वजांनी म्हटल्याप्रमाणे आपण एकटे नसतोच कधी. सगळं चराचर म्हणजे आपणच असतो. आपणच या सगळ्या जगात सामावलेलो आहोत आणि आपल्यातच सगळं जग सामावलं आहे.
प्रश्नही आपलेच. उत्तरही आपलंच. सगळं एकच आहे. सगळं एकच तर आहे.
(प्रेरणाः मिलिंद बोकील यांची "एकम")