असे कसे तुला ...

मी तर फक्त मागितले होते पाणी
असे कसे तुला दिवस गेले राणी..?

गालातल्या गालात कितीदा हसलीस,
किती लोकांची लाईन क्लीअर केलीस,
बागेमध्ये आपण गाईली फक्त गाणी ..
असे कसे तुला दिवस गेले राणी..?

मी सदा एकनिष्ठ राहिलोय तुझ्याशी
नुसती हसू नको, बोल जरा माझ्याशी..

'मी काय बोलू रे! तूच खुळा राहिलास..
दुसरी कोणी विचारेना... मला धरून बसलास'

म्हणते कशी निर्लज्जपणे, 'धर तू दुसरीला...
मी सुद्धा देत जाईन.. वाव तरूण रक्ताला...'
अगं! मी तर तुला समजत होतो शहाणी
असे कसे तुला दिवस गेले राणी..?

गल्ली ते दिल्ली मीच तुला नेले
माझ्यासवे तुला पाहून बाकीचेच लाजले
नव्हतं ते लाजणं आत्ता मला कळलं...
तुझ्याच नजरेनं अनेकांना भाळलं

माझ्या निमित्ताने तुझ्याकडे आले नि ...
माझ्याच घराला त्यांची पाटी लावून गेले..!
कोरडे पडले ओठ माझे म्हणून मागितले पाणी
असे कसे तुला दिवस गेले राणी..?

विचाराल तर सांगतो, कोण आहे ही कार्टी..
अहो, मी तर पुढारी अन् ही माझी पार्टी..