सर्व काही आज असताना काहीच आसपास नाही
डोक्यावर मुकुट सजताना चेहरा का खास नाही
होतो उंच उडणारा पतंग, साऱ्यांने डोर कापली
आज आभाळ होण्याचा किंचितसाही प्रयास नाही
कित्येक युगानंतर त्यांनी धरला रस्ता पुर्वेचा, पण
सोन पिवळ्या ऊन्हात मनी न्हाण्याची आस नाही
शुन्यात न शिरून खोल, शेवटी मी शुन्यच उरतो
हल्ली तुझ्या आठवणींचा, विचारांचा त्रास नाही
यासाठीच वास्त्वाच्या चटक्याचं न वाटलं काही
माझ्या जिवनाच्या शरीरावर स्वप्नाचं मास नाही
स्वातंत्र्याचा अर्थ शेवटी त्याने 'स्वतंत्र' कळवला
लाकडात कैद केलं, म्हणून तो कारावास नाही
असं नाही आनंदाच्याच मी सरीत भिजत असतो
वेदनांनी हेलावून सोडलं तरी अश्रूंचा दास नाही
परक्याहून वागली परकी, माझ्याच रक्ताची नाती
माझं नाव लावावस प्रिये माझा अट्टाहास नाही
अस्प्रुश्य म्हणून गावा बाहेर ज्यांनी काढलं मला
त्यांचं रक्त चाखण्यासाठी एकही आतूर डास नाही
@ सनिल पांगे